Ind vs Pak: हारिस रऊफवर कारवाई! मैदानावरील वर्तनाबद्दल दंडाची शक्यता

Asia Cup: सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. जिथे टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत 6 विकेट्सने मोठा विजय मिळवला. या सामन्यात पहिल्याच चेंडूपासून पाकिस्तानी खेळाडू हद्द पार करताना दिसत होते. सामन्यात हारिस रऊफने भारतीय चाहत्यांना वारंवार हाताने 6-0 चे इशारे केले. चाहत्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले तेव्हा त्याने फाईटर जेट पाडल्यासारखा इशारा करण्यास सुरुवात केली. यावर आयसीसीकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानची टीम सामना हरू लागली तेव्हा हारिस रऊफ मैदानात भारतीय खेळाडूंशी भिडू लागला. बाऊंड्रीवर फील्डिंग करताना चाहत्यांनी त्याला “विराट-विराट” म्हणून चिडवायला सुरुवात केली. त्यावर रऊफने आधी हाताने 6-0 चे इशारे केले. त्यानंतर त्याने हातवारे करून फाइटर जेट पाडल्याचा इशाराही केला. पाकिस्तानी चाहत्यांचे म्हणणे आहे की, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी त्यांनी भारताची 6 फाइटर जेट्स पाडली होती. त्यामुळेच रऊफ वारंवार 6-0 चे इशारे करताना दिसत होता. दरम्यान भारतीय चाहत्यांनी त्याला 2022 च्या टी-20 विश्वचषकातील विराट कोहलीचे त्याच्यावर मारलेले 2 षटकार आठवण करून दिले. आता आयसीसी हारिस रऊफवर मोठी कारवाई करू शकते.

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या खेळाडूंच्या कपड्यांशी आणि उपकरणांशी संबंधित नियमांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, खेळाडू कोणताही वैयक्तिक संदेश दाखवू शकत नाहीत. विशेषतः तो संदेश जर राजकारण, धर्म, रंग किंवा जातशी संबंधित असेल तर. या नियमांमुळे मोईन अली आणि उस्मान ख्वाजा यांच्यावरही आयसीसीने कारवाई केली होती. 2019 मध्ये महेंद्र सिंग धोनीलाही बलिदान बॅज घालून खेळण्यास मनाई करण्यात आली होती. आता या नियमांच्या आधारे हारिस रऊफवर आयसीसी कारवाई करू शकते. त्यानुसार त्यांना 1 डिमेरिट पॉइंट दिले जाऊ शकतात आणि 50 टक्के मॅच फीचा दंडही आकारला जाऊ शकतो. चाहत्यांना आता आयसीसीच्या या कारवाईची अपेक्षा आहे.

Comments are closed.