गुजरातमध्ये 1,024 बांगलादेशी यांच्याविरूद्ध कारवाई केली
सूरत-अहमदाबादमध्ये हजारो बांगलादेशी ताब्यात
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अवैध वास्तव्य करत असलेल्या विदेशी नागरिकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुजरातमध्ये 1,024 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले आहे. सूरत आणि अहमदाबाद येथील शोधमोहिमेदरम्यान बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले असून यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे, त्यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी दिली आहे.
अहमदाबादमध्ये कमीतकमी 890 तसेच सूरतमध्ये 134 बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. विदेशी घुसखोरांनी स्वत:हून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे, अन्यथा त्यांना पकडून निर्वासित केले जाईल. तसेच घुसखोरांना आश्रय देणाऱ्या लोकांच्या विरोधातही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिला आहे.
दोन बांगलादेशी निघाले दहशतवादी
बांगलादेशी घुसखोरांनी गुजरातमध्ये येण्यापूर्वी पश्चिम बंगालमधून प्राप्त बनावट दस्तऐवजांचा वापर केला. या बांगलादेशी घुसखोरांपैकी अनेक जण अमली पदार्थ तस्करी आणि मानव तस्करीत सामील आहेत. अलिकडेच अटक करण्यात आलेल्या 4 बांगलादेशींपैकी दोन जण अल-कायदाच्या स्लीपर सेलचे सदस्य होते. या बांगलादेशींची पार्श्वभूमी आणि गुजरातमधील त्यांच्या कारवायांसंबंधी तपास केला जाणार आहे. तसेच त्यांच्या निर्वासनाच्या सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचे सांघवी म्हणाले.
बनावट दस्तऐवज प्रकरणी चौकशी
बांगलादेशी घुसखोरांनी देशाच्या विविध हिस्स्यांमध्ये पोहोचण्यासाठी बनावट दस्तऐवजांचा वापर केला आहे. हे बनावट दस्तऐवज पुरविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. बांगलादेशी घुसखोरांनी पश्चिम बंगालमध्ये कशाप्रकारे बनावट दस्तऐवज मिळविले हे तेथील प्रशासनाच्या नजरेत आणून दिले जाणार असल्याचे सांघवी यांनी म्हटले आहे.
बांगलादेशात परत पाठविले जाणार
ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची चौकशी केली जात असून दस्तऐवज आणि अन्य पुराव्यांच्या आधारावर त्यांचे राष्ट्रीयत्व शोधले जात आहे. संबंधित घुसखोर बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाल्यावर केंद्र सरकार आणि बीएसएफच्या समन्वयाने त्यांच्या निर्वासनाची प्रक्रिया लवकर पूर्ण केली जाणार असल्याचे गुजरातचे पोलीस महासंचालक विकास सहाय यांनी सांगितले आहे.
Comments are closed.