नोरा फतेही-संजय दत्त यांच्या ‘सरके चुनर तेरी’ या अश्लील गाण्यावर कारवाई, हिंदी गाणे यूट्यूबवरुन हटवले
नोरा फतेहीचे ‘सरके चुनर तेरी…’ हे आयटम साँग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेले आहे. संजय दत्तच्या पॅन-इंडिया चित्रपट ‘केडी – द डेव्हिल’मधील या गाण्याने चित्रपट आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विरोध आणि टीकेनंतर, निर्मात्यांनी अधिकृतपणे यूट्यूबवरून गाण्याची हिंदी आवृत्ती काढून टाकली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, हे गाणे इतर भाषांमध्ये अजूनही यूट्यूबवर उपलब्ध आहे. याच्या तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम आवृत्त्या कोणत्याही बदलांशिवाय यूट्यूबवर उपलब्ध आहेत.
एएनआयच्या वृत्तानुसार, एका सामाजिक कार्यकर्त्या आणि वकिलाने ‘सरके चुनर’ या गाण्याविरोधात दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी या गाण्याशी संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, हे गाणे लैंगिकतेला प्रोत्साहन देते. त्याचे अश्लील बोल समाजाची नकारात्मक प्रतिमा दर्शवतात. हे गाणे सर्व प्लॅटफॉर्मवरून तात्काळ काढून टाकण्याची मागणी करण्यात आली. असे म्हटले जात होते की, नोराच्या अश्लील गाण्याचा तरुणांवर नकारात्मक प्रभाव पडेल. गाण्याचे गीतकार रकीब आलम, दिग्दर्शक प्रेम, संगीतकार अर्जुन जन्या आणि गायिका मंगळी यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली. जिंदाल यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे (CBFC) तक्रार दाखल केली.
निर्मात्यांनी गाण्याची हिंदी आवृत्ती यूट्यूबवरून काढून टाकली आहे. हे गाणे १६ मार्च पर्यंत यूट्यूबवर उपलब्ध होते. मात्र, आता अधिकृत गाणे शोधल्यावर कंटेट उपलब्ध नाही असे दिसत आहे. चित्रपटाचे निर्माते, संजय दत्त आणि नोरा फतेही यांनी अद्याप या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरूनही गाण्याचा व्हिडिओ काढून टाकला आहे.
Comments are closed.