वाळू तस्करीबाबत कारवाई टाळणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांविरोधात होणार कारवाई; चौकशी अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवणार

वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्याविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे याबाबतचा चौकशी अहवाल आला असून पोलीस महासंचालकांना हा चौकशी अहवाल पाठवला जाणार आहे.

२८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री गस्तीवर असताना राकेश जाधव यांनी चिमूर येथील हजारे पेट्रोलपंपासमोर वाळू भरलेला एक हायवा पकडला आणि चिमूर पोलीस ठाण्यात तो हायवा ठेवण्यात आला. मात्र, या ट्रकबाबतची फिर्याद, जप्ती पंचनामा यांची पोलीस ठाण्याच्या डायरीत नोंदच करण्यात आली नाही. त्यामुळे तब्बल दहा दिवस हा हायवा पोलीस ठाण्यातच होता. दरम्यान, या हायवामधील वाळू चोरीची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यामार्फत चौकशी सुरू केली आणि आता हा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मते याबाबतचा अहवाल ते लवकरच नागपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना पाठवला जाणार आहे.

Comments are closed.