एका चुकीच्या निर्णयाने राजपाल तुरुंगात आहे…त्याला मदतीची गरज आहे; सुनील पालचे आवाहन
प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव याच्या अडचणीत वाढ झाली असून 9 कोटी रुपयांच्या चेक बाऊंस प्रकरणात त्याला जामिन मिळालेला नाही. त्यामुळे त्याचा तिहार कारागृहातील मुक्काम वाढणार आहे. या प्रकरणात त्याला कोणताही दिलासा मिळालेला नाही. गुरुवारी या प्रकरणावर झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने राजपाल यादवला कडक शब्दांत फटकारले आहे.
काही वर्षांपूर्वी राजपाल यादवने ‘अता पता लापता’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरल्याने तो आर्थिक अडचणीत आला. तसेत त्याने दिलेले चेक बाऊन्स झाल्याने तो आता कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. सुरुवातीला 5 कोटी रुपयांचे असलेले हे कर्ज व्याजासह आता 9 कोटींवर पोहोचले असून, आर्थिक व्यवहार आणि चेक बाऊन्मुसमुळे त्याला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागत आहे.
राजपाल यादवच्या या कठीण काळात त्याचा जवळचा मित्र आणि कॉमेडियन सुनील पाल त्याच्या समर्थनासाठी पुढे आला आहे. याआधी सोनू सूदनेही याकठीण काळात त्याला मदत करण्याचे आवाहन केले होते. आता सुनील पालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत राजपालबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. सुनील म्हणाला की, राजपाल यादवने गेल्या 30 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे, मात्र एका चुकीच्या निर्णयामुळे आज त्याला कुख्यात गुन्हेगार असलेल्या ठिकाणी राहावे लागत आहे. राजपालने जेव्हा स्वतःचा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याला मिळालेले 5 कोटी रुपये हे कर्ज स्वरूपात आहेत याची त्याला कल्पना नव्हती. त्याने न वाचता करारावर स्वाक्षरी केल्यामुळे ही वेळ ओढवल्याचे सुनीलने नमूद केले.
गेल्या 21वर्षांपासून राजपालसोबत काम करणाऱ्या सुनील पालने चित्रपटसृष्टीतील बड्या सुपरस्टार्सवरही निशाणा साधला आहे. एवढा मोठा अभिनेता संकटात असताना इंडस्ट्रीतील दिग्गज गप्प का आहेत, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. सुनीलने आवाहन केले आहे की, कुणीही त्याला फुकट पैसे देऊ नये, पण त्याला काम देऊन किंवा इतर मार्गाने मदत करावी. राजपालसोबत 10 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेला सुनील पाल सध्या त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, सर्व विनोदी कलाकार मिळून त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले.
Comments are closed.