ठाण्यातील खड्डे, वाहतूककोंडीचे अभिनेत्रीने काढले वाभाडे

संततधार पावसाने ठाण्यातील रस्त्यांची दाणादाण उडवली आहे. त्यातच मेट्रोचे काम सुरू असल्याने घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या खड्यांमुळे दररोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असल्याने मराठी अभिनेत्री रूपाली भोसले हिलाही याचा फटका बसला. खड्डेमय रस्त्यामुळे अर्ध्या तासाच्या प्रवासाला दोन तास रखडून पडावे लागले. रूपाली भोसले यांनी याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून यंत्रणांचे चांगलेच वाभाडे काढले.

घोडबंदरवरील वाहतूककोंडीचा फटका आता सेलिब्रेटिंनाही बसू लागला आहे. मराठी अभिनेत्री रूपाली भोसले हिने नुकताच सोशल मीडियात एक व्हिडीओ शेअर करत घोडबंदर रस्त्याच्या स्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिच्या मते ‘घोडबंदर रस्त्याची काय अवस्था आहे, किती वर्षे असा प्रवास करायचा,’ असा सवाल तिने उपस्थित केला आहे. रूपाली भोसले हिने यापूर्वी ‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी विरारहून ठाण्यापर्यंत सतत प्रवास केला होता. त्या काळातही घोडबंदर रस्त्यावर खड्ड्यांचेच साम्राज्य होते आणि प्रवास त्रासदायक होता. आजही तीच परिस्थिती असून परिस्थिती काहीही बदललेली नाही, अशी संतप्त टीका भोसले यांनी केली.

Comments are closed.