Additional Director General of Police Nikhil Gupta
अवैध शस्त्र तस्करी व ड्रग्जसह अंमलीपदार्थविरोधी कारवाया करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, पोलिसांनी टेक्नोसेव्ही पोलिसिंगवर भर द्यावा, गुन्ह्यांचा तपास करताना त्रुटी टाळण्यासाठी व्हिडीओ पंचनामा करावा. त्यामुळे न्यायालयात खटल्यादरम्यान साक्षीदारांची फितुरी टाळता येईल, सहायक पोलीस आयुक्त व पोलीस उपअधीक्षकांनी हद्दीतील पोलीस ठाण्यांना आठवड्यातून एकदा भेट देत तक्रारींची निर्गती करावी, अशा सूचना राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांनी पोलिसांना दिल्या. (Conduct special campaign against drugs, illegal arms smuggling: Additional Director General of Police Nikhil Gupta)
गुप्ता यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.२१) नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात नाशिक परिक्षेत्रासहासह शहर आयुक्तालयातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जळगावचे अधीक्षक महेश्वर रेड्डी, धुळ्याचे अधीक्षक श्रीकांत धिवरे, अहिल्यानगरचे अधीक्षक सोमनाथ घारगे, नंदूरबारचे अधीक्षक श्रवण दत्त उपस्थित होते.
इंडस्ट्रियलमाफिया, माहिती अधिकार कार्यकत्यांवर कारवाई करा : उद्योजक
अंबड, सिन्नरसह नाशिक शहर व जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये इंडस्ट्रियलमाफिया वाढत आहेत. माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर केला जात आहे. या इंडस्ट्रियलमाफिया व माहिती अधिकार कार्यकर्ते उद्योजकांची वाहने अडवून बोलणी करत आहेत. या कार्यकर्त्यांना कोणती माहिती द्यावी, असा काही निकष आहे, अशी विचारणा उद्योजकांनी केली. शिवाय, अंबडमधील पोलीस चौकी कार्यान्वित करावी. पोलीस मनुष्यबळ वाढवावे. सायबर क्राईम रोखावे, अशी मागणी उद्योजकांनी गुप्तांकडे केली. यावेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष ललित बूब, उद्योजक हर्षद बेळे आदींनी केली.
Comments are closed.