आदिल रशीदचा भीमपराक्रम! टी20 क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पूर्ण; पाकिस्तानच्या हॅरिस रौफचा विक्रम उध्वस्त

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 196 धावांचे मोठे आव्हान उभे केले. इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने (Adil Rashid) या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या 4 षटकांत केवळ 16 धावा देऊन 2 बळी टिपले. या दोन विकेट्सच्या जोरावर रशीदने टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठला असून पाकिस्तानच्या हॅरिस रौफचा विक्रमही मोडला आहे.

टी20 क्रिकेटमध्ये 400 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा आदिल रशीद हा जगातील 13 वा खेळाडू ठरला आहे. तसेच, हा पराक्रम करणारा तो ख्रिस जॉर्डननंतरचा दुसराच इंग्लिश गोलंदाज आहे. ख्रिस जॉर्डनच्या नावावर सध्या 446 विकेट्स आहेत. रशीदने आतापर्यंत 358 टी20 सामन्यात 22.72 च्या सरासरीने 401 विकेट्स घेतल्या आहेत.

आदिल रशीद आता टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ख्रिस जॉर्डनला (31 विकेट्स) मागे टाकत आतापर्यंत एकूण 33 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

एका विशिष्ट संघाविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही आता रशीदच्या नावावर झाला आहे. रशीदने वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत 41 विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या हॅरिस रौफच्या नावावर होता, ज्याने न्यूझीलंडविरुद्ध 40 विकेट्स घेतल्या होत्या.

Comments are closed.