आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय! आदिनाथ आणि ऊर्मिला कोठारे यांचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत दिली माहिती
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आदिनाथ आणि ऊर्मिला कोठारे यांनी घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही काळापासून दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. या चर्चा आता खऱ्या ठरल्या असून आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली.
काय आहे पोस्ट?
आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो, खूप विचार केल्यानंतर, आम्ही, आदिनाथ म. कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिज़ा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन करत आहोत.
आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील. गेल्या काही वर्षांत मीडिया आणि तुम्हा सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहतील, अशी आम्हाला आशा आहे.
म्हणूनच, आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद, असे आदिनाथ आणि ऊर्मिला कोठारे यांनी केलेल्या संयुक्त पोस्टमध्ये म्हटले आहे.
Comments are closed.