Aditi tatkare said women will get february and march month ladki bahin scheme installments
मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतून अनेक महिलांना अपात्र करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता सुद्धा देण्यात आला नाही. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण, फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता कधी मिळणार? 1500 चे 2100 रूपये कधी होणार? या सगळ्या प्रश्नांची महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी उत्तरे दिली आहेत. त्या विधिमंडळ परिसरात प्रसारमध्यमांशी संवाद साधत होत्या.
फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता मिळेल
आदिती तटकरे म्हणाल्या, “फेब्रुवारी महिन्यातील हफ्ता 8 मार्चला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे. पाच ते सहा तारखेपासून याची प्रक्रिया सुरू होईल. सर्व महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता मिळेल.”
अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचलो
80 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाणार, असा विरोधकांचा आरोप आहे. याबद्दल विचारल्यावर आदिती तटकरे यांनी म्हटले, “सुरूवातीपासून विरोधक आरोप करत आले आहेत. आम्ही साधारपणे अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचलो आहोत. गेल्या महिन्यात 2 कोटी 40 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. ही योजना जाहीर झाल्यापासून विरोधकांना खुपत आहे. महिलांकडून लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांमध्ये नैराश्य पसरले आहे. महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजना सक्षमपणे चालू ठेवणार आहोत.”
मार्च महिन्याचा हफ्ता…
मार्च महिन्याचा हफ्ता कधी मिळणार? 2100 रूपायांची तरतूद अधिवेशनात केली जाणार आहे का? असे विचारल्यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “मार्च महिन्याचा हफ्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर दिला जाईल. 2100 रूपये देण्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार निर्णय घेतील. आमच्या खात्यापर्यंत निधी येतो, तो महिलांच्या खात्यात पोहचवणे ती यंत्रणा अधिक कार्यान्वित करण्याचे काम आम्ही करतो.”
Comments are closed.