Aditya Thackeray anger over insult to Chhatrapati Shivaji Maharaj
मुंबई : अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून शिवीगाळ केली आहे. मात्र शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. अशातच सपा नेते अबू आझमी यांनी औरंगजेबला महान राजा म्हणत त्याकाळी भारतातून सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले. यावरून आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. याप्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. (Aditya Thackeray anger over insult to Chhatrapati Shivaji Maharaj)
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विचारण्यात आले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाईसाठी वेगळ्या कायद्याची मागणी होत आहे. या प्रश्नावर ते म्हणाले की, वेगळ्या कायद्याची गरज नाही. महाराष्ट्रात जर कोणी महाराजांचा अपमान होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्हाला कायदा कशाला पाहिजे? राहुल सोलापूरकर, कोरटकर, अबु आझमी महाराजांबद्दल बोलले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? या तिघांवर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत.
प्रशांत कोरटकर उत्तर प्रदेशला पळून गेले आहेत. असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, ते कुठेही पळून गेले असतील. पण काही ठराविक लोक बँकांक जाणारे पाच तासात सापडतात. अशावेळी महाराजांचा अपमान करणारे तुम्हाला सापडत का नाहीत? छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जो कोणी अपमान करेल, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. माजी राज्यपाल कोश्यारी महापुरषांचा अपमान करत होते. ती प्रथा आता भाजपा आणि त्यांचे सुपारी घेणारे लोक पुढे चालू ठेवत आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
Comments are closed.