आदित्य ठाकरे यांनी आयोगाला उघडे पाडले, मुंबईत 11 लाख नव्हे, 14 लाख दुबार मतदार

मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये 11 लाख नव्हे, तर तब्बल 14 लाख दुबार नावे आहेत. शिवाय धक्कादायक म्हणजे, आयोगाने 1 जुलैपर्यंतची यादी पालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरणार असल्याचे जाहीर केले असताना मतदार यादीत 30 हजार मतदार वाढल्याचे आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुराव्यांसह उघड केले. वाढलेली नावे कुणी आणि कशी घुसवली याचे उत्तर आयोगाने द्यावे, असे आव्हानच त्यांनी दिले.

आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मुंबईच्या मतदार यादीतील घोळाचा पुन्हा एकदा पर्दाफाश केला. शिवसेना, युवासेना आणि शिवसेनेच्या अंगिकृत संघटनांच्या माध्यमातून यादीमधील घोळाची तपासणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. मतदार याद्यांमध्ये शेकडो नावे दुबार असून त्यांचे फोटो, पत्ते वेगवेगळे आहेत. या तपासणीमधून यादीमधील मोठे घोळ समोर येत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 227 प्रभागांमध्ये प्रत्येकी सुमारे तीन हजार हरकती, तक्रारी आल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे, नावे दुबार किंवा वगळलेल्यांमध्ये विरोधकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेत्यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे नाव सात वेळा, तर आमदार सुनील शिंदे यांचे नाव आठ वेळा आले असल्याचे त्यांनी उघड केले. काही दुबार नावांच्या व्यक्ती वेगवेगळय़ा असल्या तरी सर्वाधिक दुबार नावे असलेल्या नावांबाबत गेंधळच असल्याचे ते म्हणाले. यावेळी शिवसेना सचिव सूरज चव्हाण, सिनेट सदस्य मिलिंद साटम आणि परम यादव उपस्थित होते.

मृतांच्या नावे कोण मतदान करतेय…
विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मृत मतदारांच्या जागी मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकारही आदित्य ठाकरे यांनी याद्या दाखवत उघड केला. याचे उत्तर कोण देणार, असा सवालही त्यांनी केला. मतदार यादीतील गोंधळ म्हणजे लोकशाही मारून टाकण्याचा प्रकार आहे. याविरोधात चळवळ उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

1 जुलैनंतर 30 हजार नावे कशी घुसवली?
विरोधकांना गुंतवून ठेवण्यासाठी मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात आला आहे. असे असेल तर इलेक्शन घेण्यापेक्षा सिलेक्शन करा आणि मोकळे व्हा. ही सर्कस थांबली पाहिजे. मात्र ज्यांना एक बूथ सांभाळता येत नाही ते ‘वन नेशन, वन इलेक्शन’ कसे घेणार? – आदित्य ठाकरे

‘बीएलओं’ना लिहिता-वाचता येत नाही
मुंबईतील दुबार नावांबाबत पालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तपासणी सुरू आहे. मात्र या बीएलओंना लिहिता-वाचता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. हे बीएलओ सक्षम नसतील किंवा त्यांना ट्रेनिंग दिले गेले नसल्यास मतदार याद्या स्वच्छ कशा होणार, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

Comments are closed.