परीक्षण – मूल्यसंस्कारांची कथा

>> सुधाकर वसईकर

सतीश सोळांकूरकर मराठी साहित्य क्षेत्रातील एक सुपरिचित नाव. आजवर त्यांनी अनेक वाङ्मय प्रकारात विपुल आणि लक्षणीय लेखन केले आहे. अलीकडेच अनघोस्तवात त्यांचं एकोणिसावं पुस्तक `अज्ञात झऱयाच्या रात्री’ प्रकाशित झालं आहे. हा त्यांचा हा पहिलाच कथासंग्रह! नव्वदी पार केलेली त्यांची आई गोष्टी वेल्हाळ आहे. म्हणूनच अज्ञात झऱयाच्या दिशेने हळूहळू पुढे सरकणाऱया आपल्या आईच्या मोगरी श्वासांना त्यांनी हा कथासंग्रह अर्पण केला आहे.

मुलं स्थिरस्थावर झालीत. घरगृहस्थीत अडकली की काहींना आपले वृद्ध आई-वडील त्यांना अडगळ वाटू लागतात. त्यांना वृद्धाश्रमात अर्थातच ओल्ड-केयर-हाऊस या गोंडस नावाखाली ठेवतात. नाहीतर मानसिक छळ तरी करतात. वृद्ध लोकांच्या या कटू पण सत्य अनुभवविश्वाभोवती `अज्ञात झऱयावर रात्री’, `पुनरावृत्ती’ आणि `लवलता’ या तीनही कथा फिरत असल्या तरी विभिन्न परिस्थितीत घडणाऱया घटना तदनुसार वळण घेत गेलेले विलक्षण उपकथानक, पात्रे, आणि त्यांचे स्वभाव याचे बारकाव्यांनीशी मानसशास्त्राrय पातळीवर केलेले विश्लेषण कथाशय गडद करणारे असून मन हेलावून सोडणारे आहे. मुलांच्या अनाकलनीय वर्तणुकीने एकाकी पडून, खचून जाऊन काही वृद्ध आपले जीवन संपवतात तर `पुनरावृत्ती’ कथेत वृद्ध आई-वडील अशा परिस्थितीला कणखरपणे, मोठय़ा मनोधैर्याने सामोरे जातात आणि पाल्यांना धडा शिकवून वठणीवर आणतात.

बॉसच्या सांगण्यावरून, आपल्या आजारी आईला भेटायला निघालेल्या एक वयस्क माणसाला ज्याच्या खिशात एकही पैसा नाही अशा व्यक्तीला ट्रेनमध्ये जाऊन 500/- रुपये देण्याची कामगिरी लेखक कशी पार पाडतो? हा स्वानुभव कथन करणारी `ज्याच्या खिशात पैसे नाही…’ मनोरंजक कथा छानच जमून आलीय. सत्तावीस वर्षांची मुलगी आठ-दहा वर्षांच्या मुलगीसारखी वागते. केवळ बुद्ध्यांक कमी असल्याने तिचे लग्न कुठे जुळत नाही याचे कारुण्यमय चित्रण `गाईच्या भरलेल्या डोळ्यांची कधीही थट्टा करू नये’ कथेत रेखाटले आहे. तर केवळ शिक्षण कमी असल्याने मुलाचे लग्न जमत नाही याची आई- बापाला भेडसावणारी चिंता `मुलाचा बाप’ कथेत चितारली आहे. न्यूनतेवर मात करता येते. फक्त जगणं प्रामाणिक असले पाहिजे. साथ देणारी माणसंही याच जगात आहेत, असा विश्वास जागविणारी `मैत्र’ कथा उत्कृष्ट आहे.

अज्ञात झऱयावर रात्री, गाईच्या भरलेल्या डोळ्यांची कधीही करू नये थट्टा आणि परतीच्या घोडय़ाला कोणासंगे पाठवू? या ग्रेस यांच्या कवितेच्या ओळीचं कथांचे शीर्षक आहेत. यावरूनच लेखकावर ग्रेस यांच्या कवितेने गारुड केल्याची जाणीव वाचकाला होत जाते. अस्वस्थ मन आणि अज्ञानाची चाहूल, नाजूकपणा आणि काळाची गती, निसर्गातील गूढता आणि एकाकीपण, लोभ, विरक्ती आणि मृत्यूची/एकांताची साक्ष तसेच निसटून जाण्याची ओढ या आशयार्थाभोवती तीनही कथा इतक्या उत्कटतेने गुंफल्या आहेत की वाचक कथेत गुंतत जातो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे संग्रहातली शेवटची कथा `परतीच्या घोडय़ाला कोणासंगे पाठवू?’ या शीर्षक ओळीतून मानवी मनातील एकाकीपणा, विषण्णता आणि जीवनाच्या उत्तरार्धातील किंवा प्रवासाच्या अखेरची हतबलता व्यक्त होते. एक प्रतिथयश लेखक बसला आहे. छान दिपाम जमून आलाय. तरीही त्याला एकाकीपण छळतेय. विषण्णता स्वस्थ बसू देत नाहीये. समोर ग्रेसच पुस्तक आहे. त्यात आत्ताही एक चिठ्ठी अडकून पडली आहे. पाकिटावर तान्या नाव आहे. चिठ्ठीच्या वरती काहीही मायना नाही. तूटक तुटक कविता आहे. आणि त्याला असं वाटतं की तिने आता इथे येऊ नये. इतका तो अवस्थ आहे. ग्रेस यांच्या कवितेतून कथानक उलगडत जाते.

बंद दरवाजा असलेल्या कुलूप लावलेल्या घरातून एक फाईल शोधायची असते. हे काम घेऊन निघालेली व्यक्ती एका गावात प्रवेशते. या कामाचे त्या व्यक्तीला पैसे मिळणार असतात. पण त्या गावात कोणत्याच घराला दरवाजे नसतात. तिथेच कथानक रहस्यमयतेकडे वळण घेते. त्या व्यक्तीला दरवाजा असलेले बंद घर मिळते का?
नदी नाही, पाणी नाही, तरीही चाले नाव –
दार नाही, दरवाजा नाही ,
असे कोणते गाव?

या कोड्याच्या स्वरूपातील चमत्कृतीपूर्ण ओळींच्या रसास्वादातून रहस्याचा उलगडा होऊन, कथा परिणामाचा उत्कर्ष बिंदू गाठणारी अप्रतिम कथा `नदी नाही… पाणी नाही… कथासंग्रहात वाचणे अतिशय रंजक आहे. प्रस्तुत संग्रहात मुंग्या, घालमेल, निर्णय आदी लघुकथा वाचनीय व कथाशयाचा व्यापक पट मांडणाऱया आहेत. कथांमधील मुख्य पात्र सोडले तर इतर पात्रांना नावेसुद्धा दिलेली नाहीत. तरी देखिल कथांमधील पात्रे वाचकांसमोर येतात आणि लक्षात राहातात. गतिमान कथानक या लघुकथांचं मुख्य वैशिष्टय़ आहे.

अज्ञात झऱ्यावर रात्री
लेखक : सतीश सोळांकूरकर
प्रकाशक : अनघा प्रकाशन
पृष्ठे: 96 एच किंमत: रुपये 170/-

Comments are closed.