सिनेमातील क्रौर्यालाही लाजवेल अशा पद्धतीने अनिकेत कोथळेला मारले! ऍड. उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद

हिंदी सिनेमातील क्रौर्यालाही लाजवेल अशा पद्धतीने अनिकेत कोथळे याला संशयित आरोपींनी मारले, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापुढे केला. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या कोर्टात चालू आहे. आज सुनावणीचा तिसरा दिवस होता. सुनावणीवेळी सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, जिल्हा पोलीसप्रमुख संदीप घुगे तसेच सीआयडीच्या पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. या खटल्यातील पुढील सुनावणी 13 मार्च रोजी होणार आहे.

अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी आज तिसऱया दिवशी पुढे सुरू झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांचा युक्तिवाद पुढे चालू ठेवला. ते म्हणाले, अनिल लाड याने वापरलेल्या गाडीचा नंबर सांगितला. याशिवाय गाडीच्या मालकीबद्दल सांगितले होते. यातील साक्षीदार प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बुधवंत यांनी मृतदेहाचा इनक्वेस्ट पंचनामा केला होता. तसेच पंचांसमोर दोन पिशवीमध्ये जळालेल्या मृतदेहाचे भाग भरून ते सील करून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांच्याकडे सुपूर्त केले. 6 नोव्हेंबर 2017 रोजी सरकारी वकील चौरे यांना संशयित युवराज कामटे यांनी फोन केला होता. त्यावेळी कामटेने रिमांडवेळी त्याच्या हातून एका संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. धीरज पाटील यांनी कामटेचा मोबाईल जप्त केला होता, याबद्दल कामटेला विचारले असता, त्याने उत्तर देणे टाळले होते. तसेच यासंदर्भात धीरज पाटील यांचा उलट तपास घेण्याचेही टाळले. त्यावेळी बचाव पक्षाने बाजू मांडताना कामटे या घटनेच्या वेळी सांगलीत हजर नव्हता तर त्यावेळी तो मिरजेतील सदभावना हॉल येथे अँकरिंगच्या एका कार्यक्रमासाठी गेला होता, शिवाय कामटेने कोथळेला अटक केली नव्हती. अशा पद्धतीने बचावदेखील घेण्यात आला होता. याच्या पृष्टय़र्थ कामटेने काही फोटो हजर केले होते ज्यावर कोणत्याही प्रकारच्या तारखेचा उल्लेख नव्हता, शिवाय वायरलेस मेसेज व डय़ुटी बटवडा रजिस्टरचा कामटेने बचावासाठी आधार घेतला होता. स्वतःच्या हुशारीने अनेक बक्षिसे मिळवले असे कामटेचे म्हणणे आहे. पण जी व्यक्ती तेरा वर्षे इथे आहे, त्याला सांगली मिरजेचे अंतर माहीत नाही हे शक्य नाही. तो न्यायालयात खोटे सांगतो, असेही निकम यांनी स्पष्ट केले.

मारुती लोंढे व अमोल भंडारे हे या केसमधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. असे सांगून घटनेदिवशी मारुती लोंढे शेजारील रूममध्ये हजर होता. ज्या पद्धतीने अनिकेत कोथळेला उलटे टांगून हातपाय बांधून तोंडात बोळा घालून मारहाण केली जात होती. ते बघून लोंढे यांनी, ‘एवढे मारू नका’, असे कामटेला सांगितले होते. पण कामटे म्हणाला, ‘तुला काय करायचे? तू गप बस’, असे म्हणून हिंदी सिनेमातील क्रौर्यालाही लाजवेल अशा पद्धतीने अनिकेत कोथळेला मारले, असेही निकम यांनी सांगितले. तसेच पोलीस स्टेशनमध्ये कामटेची एवढी दहशत होती की, पीएसआय चव्हाण हे सगळे बघून पळून गेला होता, असे सांगितले. ज्या पद्धतीने कामटेने कोथळेला मारहाण केली ते पाहता ही त्याची नैसर्गिक वर्तणूक व स्वभाव होता, असे निकम यांनी स्पष्ट केले.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या तपासात विलंब झाला हे मान्य करीत निकम म्हणाले, केवळ या आधारे सगळीच योग्यता नाकारता येणार नाही. या संदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायनिवाडेदेखील न्यायालयात हजर केले. यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी, सीआयडीचे उपअधीक्षक प्रमोद नलवडे, अमोल ठाकूर यांनी सरकार पक्षाला मदत केली.

Comments are closed.