अफगाण परराष्ट्रमंत्री भारताला भेट देतात
द्विपक्षीय संबंधांवर व्यापक चर्चा होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे विदेश व्यवहार मंत्री अमीर खान मुत्तकी यांच्या भारत दौऱ्याला प्रारंभ झाला आहे. गुरुवारी त्यांचे दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेचे पुनरागमन झाल्यानंतर कोणत्याही महत्वाच्या अफगाणी नेत्याची ही प्रथम भारत भेट आहे. या भेटीत ते भारताशी द्विपक्षीय संबंधांवर व्यापक चर्चा करणार आहेत. त्यांचा भारत दौरा सहा दिवसांचा आहे. त्यांच्या भारतातील वास्तव्यात त्यांच्याशी विविध स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती भारताच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी मुत्तकी यांची चर्चा येत्या एक-दोन दिवसांमध्ये होणार आहे. मुत्तकी यांच्या भारताच्या दौऱ्यावर जाण्याची अनुमती संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतीच दिल्याने ते भारतात आले आहेत.
डोवाल यांच्याशीही चर्चा होणार
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही मुत्तकी यांनी चर्चा येत्या शनिवारी होणार आहे. भारताच्या विदेश विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांनी काही दिवसांपूर्वी मुत्तकी यांची दुबई येथे भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुत्तकी यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. अफगाणिस्तानच्या विकासात भारताचा मोठा सहभाग आहे. हा सहभाग अधिक वाढवण्याचा भारताचा विचार आहे. त्यासंबंधी दोन्ही देशांची चर्चा दुबईत झाली आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला आत्तापर्यंत केवळ रशियाने अधिकृत मान्यता दिली आहे. भारतासह आणखी देशांनी तालिबान सरकारला मान्यता द्यावी, अशी अफगाणिस्तानची इच्छा आहे. भारताशी चर्चा करताना, मुत्तकी हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे.
आर्थिक सहकार्य वाढविणार
भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश एकमेकांशी आर्थिक सहकार्य वाढविण्याच्या योजनेवर काम करीत आहेत. भारताने आजपर्यंत त्या देशात अनेक प्रकल्प स्थापन करण्याच्या कामी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पांपैकी काही पूर्ण झाले आहेत. तर काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. भारताने अफगाणिस्तानात गुंतवणूक वाढवावी, अशी त्या देशाची इच्छा आहे. तथापि, भारत सावधानतेने पावले टाकत आहे. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून भारताचे त्या देशाशी संबंध सुधारले आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.
तालिबानने अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर अफगाणिस्तानची सूत्रे हाती घेतली आहेत. तथापि, आता अमेरिकेने अफगाणिस्तानातील बगराम विमानतळ मागितला आहे. या विमाततळावर पुन्हा अमेरिकेचा वायुतळ उभा करण्याची अमेरिकेची योजना आहे. तथापि, तालिबानने या मागणीला विरोध केला असून अमेरिकेला कोणतीही भूभी देणार नाही, असा निर्धार केला आहे. या मुद्द्यावर मुत्तकी यांची भारताची चर्चा होणार काय, हा औत्सुक्याचा विषय आहे. अधिकृतरित्या अशी चर्चा होईल, अशी माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, अनौपचारिकरित्या या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे.
Comments are closed.