अफगाण मंत्री महिला पत्रकारांमध्ये प्रवेश रोखतात
राहुल गांधींसह अनेक विरोधी नेत्यांचा पंतप्रधानांवर निशाणा : हात झटकण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्तकी यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र, दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाने यावर सारवासारव केली आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. त्यांनी पत्रकारांना आमंत्रित केले नव्हते. ही पत्रकार परिषद अफगाण दूतावासात आयोजित करण्यात आली होती, असे स्पष्टीकरण देत हात झटकण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे.
महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याच्या मुद्यावरून काँग्रेस खासदार प्रियंका गांधी-वधेरा यांनी पंतप्रधान मोदींना जाब विचारला आहे. ‘महिला आपल्या देशाचा कणा आणि अभिमान असताना भारताने आपल्या देशातील काही सर्वात सक्षम महिलांचा अनादर कसा होऊ दिला?’ अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर वाद वाढत असताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण देत यात सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचे जाहीर केले. जेव्हा अफगाणिस्तानचे मंत्री दिल्लीत दाखल होण्यापूर्वी मुंबईतील अफगाणिस्तानच्या कॉन्सुल जनरलने 10 ऑक्टोबर रोजी निवडक पत्रकारांना आमंत्रण पाठवले होते. अफगाण दूतावास भारत सरकारच्या अखत्यारीत येत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर मुत्तकी 9 ते 16 ऑक्टोबर दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी दिल्लीत भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. बैठकीनंतर कोणतीही संयुक्त पत्रकार परिषद झाली नाही. मात्र, मंत्र्यांनी अफगाण दूतावासात स्वतंत्रपणे माध्यमांशी संवाद साधला. तथापि, पत्रकार परिषदेत फक्त निवडक पुरुष पत्रकार आणि अफगाण दूतावासाचे अधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत एकही महिला पत्रकार नव्हती. अनेक महिला पत्रकारांनी आपल्याला प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर केला. या दाव्यानंतर विरोधी पक्षनेत्यांसह अनेक महिलांनीही याबाबत आवाज उठवत नाराजी व्यक्त केली.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारची महिलांबाबतचे धोरण भारतापेक्षा बरेच वेगळे आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथे तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. तेथे मुलींना शाळेत जाण्यावर, सार्वजनिक ठिकाणी बोलण्यावर, चेहरा दाखवण्यावर आणि खेळांमध्ये भाग घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल
पंतप्रधान मोदी, जेव्हा तुम्ही महिला पत्रकारांना सार्वजनिक व्यासपीठांवरून वगळण्याची परवानगी देता, तेव्हा तुम्ही भारतातील प्रत्येक महिलेला सांगत आहात की तुम्ही (पंतप्रधान) खूप कमकुवत आहात आणि त्यांच्यासाठी उभे राहण्यास असमर्थ आहात. अशा भेदभावावर तुमचे मौन महिला सक्षमीकरणावरील तुमच्या घोषणांचा पोकळपणा उघड करते.
देबँडमध्ये पत्रकार परिषद रद्द केली
दिल्लीतील कार्यक्रमानंतर अफगाणिस्तानचे मंत्री उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये पोहोचले. दिल्लीतील गोंधळानंतर मुत्तकी यांची देवबंदमधील पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. तसेच ते नियोजित वेळेच्या अडीच तास आधीच उत्तर प्रदेशातून निघून गेले. ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थांबणार होते, परंतु दुपारी 2:30 वाजता निघून गेले. प्रचंड गर्दीमुळे त्यांचे काही कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला. ते इस्लामिक शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या दारुल उलूमला भेट देण्यासाठी देवबंदला आले होते.
मौलाना मदानी यांच्याशी चर्चा
मुत्ताकी यांनी येथे जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदानी यांची भेट घेतली. त्यानंतर अर्शद मदानी यांनी भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध केवळ धार्मिक किंवा शैक्षणिक नसून ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन केले. मुत्ताकी देवबंद येथील दारुल उलूम ग्रंथालयात पोहोचले. त्यांच्या आगमनानंतर कॅम्पसमध्ये मोठी गर्दी जमल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली. कडक सुरक्षा व्यवस्थेत मुत्ताकी यांनी जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदानी यांची भेट घेतली. यादरम्यान, अर्शद मदानी यांना अफगाणिस्तानच्या मंत्र्यांना निघून जाण्यास सांगावे लागले.
Comments are closed.