व्हाईट हाऊसजवळ अफगाणी शरणार्थीचा गोळीबार; दोन जवान गंभीर जखमी

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाईट हाऊसजवळ एका अफगाणिस्तानच्या शरणार्थीने राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या दोन जवानांवर गोळीबार केला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटले असून अमेरिकेत अफगाणिस्तानच्या शरणार्थींना तत्काळ प्रवेश बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हल्ला करण्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झाला नाही.

हल्ला करणाऱया अफगाणी शरणार्थीला अटक करण्यात आली असून रहमानुल्ला लाकनवाल असे त्याचे नाव आहे. अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास त्याने व्हाईट हाऊसजवळच्या फॅरागट वेस्ट मेट्रो स्थानकाजवळ तैनात असलेल्या सुरक्षा दलांवर गोळीबार केला. तो काही वेळ तेथे उभा होता. त्यानंतर त्याने सर्वप्रथम एका महिला गार्डच्या छातीवर आणि डोक्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याने दुसऱया गार्डवर गोळीबार केला. त्याचवेळी तिसऱया गार्डने लाकनवाल याच्यावर प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यानंतर लाकनवालवर नियंत्रण मिळविता आले. जखमी झालेल्या लाकनवालला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.

शरणार्थी नागरिकाने हल्ला केल्यानंतर अमेरिकेने अफगाण नागरिकांची इमिग्रेशन प्रक्रिया तत्काळ अनिश्चित काळासाठी रोखली आहे. सुरक्षेसंबंधी तपासणी आणि प्रतीक्षा यादीबाबत आढावा घेण्यात येईल. तोपर्यंत कोणत्याही अफगाण नागरिकाची इमिग्रेशन प्रक्रिया पुढे नेता येणार नाही.

कोण आहे हल्लेखोर लाकनवाल?
प्राप्त माहितीनुसार, लाकनवाल हा वर्ष ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर अमेरिकेत दाखल झाला होता. त्याने 2024 मध्ये शरणार्थी होण्यासाठी अर्ज केला होता, तो 2025 मध्ये मंजूर झाला. लाकनवाल हा वॉशिंग्टनजवळच्या बेलिंगहैम येथे पत्नी आणि पाच मुलांसोबत राहत होता. अमेरिकेत येण्यापूर्वी तो 10 वर्षे अफगाणिस्तानच्या लष्करात तैनात होता. अमेरिकेच्या विशेष पथकांसोबत त्याने अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. अमेरिकेत आल्यानंतर तो अॅमेझॉनमध्ये कामाला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

पेंटागॉनला दिले सुरक्षा वाढवण्याचे निर्देश
हल्ल्यानंतर संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी गोळीबाराच्या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटले असून न्याय विभागाने त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीका करताना ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या काळात अफगाणिस्तानातून अमेरिकेत आलेल्या प्रत्येक नागरिकाची चौकशी करण्याची गरज आहे. ज्यांचा अमेरिकेला कोणताही फायदा नाही किंवा इथे राहण्याचा हक्क नाही, अशांना देशातून हाकलण्यासाठी पावले उचलावी लागतील. हा हल्ला देश आणि मानवतेविरोधात आहे. हल्लेखोर जनावर असून त्याला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे ट्रम्प म्हणाले. वॉशिंग्टनमध्ये सुरक्षा वाढविण्याचे निर्देश ट्रम्प यांनी पेंटागॉनला दिले आहेत.

Comments are closed.