T20 WC26: अफगाणिस्तानने यूएईविरुद्धच्या विजयाने उघडले स्पर्धेचे खाते, दक्षिण आफ्रिकेचा सुपर 8 मध्ये प्रवेश

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत २८वा सामना अफगाणिस्तान विरुद्ध यूएई आज (सोमवारी, १६ फेब्रुवारी) खेळला गेला. यामध्ये अफगाणिस्तानने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. याबरोबरच त्यांचे स्पर्धेतील विजयाचे खाते उघडले आहे. या विजयाचा दक्षिण आफ्रिकेलाही फायदा झाला आहे. त्यांना स्पर्धेच्या सुपर-८चे तिकीट मिळाले आहे. अझमतुल्लाह उमरजईने अष्टपैलू खेळी केल्याने तो ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला.
या सामन्यात यूएईने प्रथम फलंदाजी केली. त्यामध्ये सोहेब खानने अर्धशतक केल्याने यूएईने २० षटकात ९ विकेट्स गमावत १६० धावा केल्या. अफगाणिस्तानने हे लक्ष्य १९.२ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने रहमानुल्लाह गुरबाझची विकेट लवकरत गमावली. त्यानंतर इब्राहिम जादरानने अर्धशतकी खेळी केली आणि संघाचा धावफलक हलता ठेवला. त्याने दुसऱ्या विकेटसाठी गुलबदिन नईबसोबत ४० धावांची भागीदारी केली. इब्राहिम ४१ चेंडूत ५३ धावा करत बाद झाला. त्यानंतर दारविश रसूली आणि अझमतुल्लाह उमरजईने २१ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. गोलंदाजीत त्याने ४ षटकात १५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
या सामन्यानंतर ग्रुप डी च्या गुणतालिकेत बदल झाला आहे. अफगाणिस्तान ३ पैकी एक सामना जिंकत २ गुणांसह तिसऱ्या स्थानी आला आहे. युएईनेही ३ पैकी एक सामना जिंकला, मात्र त्यांचा नेट रनरेट कमी असल्याने ते चौथ्या स्थानावर आहेत. अफगाणिस्तानचा पुढील सामना कॅनडाविरुद्ध आहे. त्यांना जर सुपर ८ मध्ये जायचे असेल तर कॅनडाविरुद्ध जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच न्यूझीलंडचा सामनाही कॅनडा विरुद्ध आहे. यामध्ये न्यूझीलंड जिंकला तर ते सुपर ८ मध्ये जातील आणि अफगाणिस्तान बाहेर पडतील.
Comments are closed.