27 वर्षांनंतर … दिल्ली भाजपावर रागावली आहे
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रचंड विजय मिळविला आहे. तब्बल 27 वर्षांच्या अंतरानंतर दिल्ली विधानसभेत या पक्षाने पुन्हा मुसंडी मारत दोन तृतियांशापेक्षा अधिक बहुमत प्राप्त केले आहे. गेल्या साडेअकरा वर्षांपासून सलग सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षावर पराभवाची नामुष्की झेलण्याची वेळ आली. भारताची राजधानी असलेल्या या नगरीची ही विधानसभा निवडणूक अनेक वैशिष्ट्यांनी, विक्रमांनी आणि विशेष घडामोडींनी सजली आहे. तसे दिल्ली हे छोटे राज्य आहे. पण त्याचे राजकीय महत्व मोठे आहे. त्यामुळे या राज्यातील लोकसभा निवडणूक असो, किंवा विधानसभा निवडणूक असो, तिची चर्चा देशभर होतेच. या निवडणुकीचा हा संक्षिप्त आढावा…
गेल्या पंचवीस वर्षांमध्ये…
ड दिल्लीचे राजकारण प्रारंभापासूनच भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षांभोवतीच फिरत राहिले आहे. मात्र, 2013 च्या विधानसभा निवडणुकीपासून आम आदमी पक्षाचा उदय झाला आणि नेहमी दुरंगी असणारी दिल्लीची लढत तिरंगी झाली. पण नंतर काँग्रेसचा रंग मावळला आणि भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष असे दोनच तगडे प्रतिस्पर्धी दिल्लीच्या मैदानात उरले आहेत.
ड 1998 ते 2013 या पंधरा वर्षांच्या काळात काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात सलग तीन विधानसभा निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यावर आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. पण ते एक वर्षातच कोसळले होते. त्यानंतर 2015 च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा धुव्वा उडवत 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या.
ड 2020 च्या विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागा जिंकून एकहाती प्रचंड विजय मिळविला होता. भारतीय जनता पक्षाला अवघ्या 8 जागांवर समाधान मानावे लागले होते. या कालखंडात आम आदमी पक्षाचा झपाटा एवढा मोठा होता, की, हा पक्ष 20 ते 25 वर्षे सत्तेवरुन हटणार नाही. असे तज्ञांनाही वाटू लागले होते. तथापि, 2025 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ‘आप’ची गाडी उलटविण्यात यश मिळविले.
27 वर्षांनंतर भाजपची सरशी
ड 1993 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिल्लीत बहुमत मिळविले होते. मदनलाल खुराणा मुख्यमंत्री बनले होते. पण जैन डायरी प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना पदत्याग करावा लागला. नंतर साहेबसिंग वर्मा मुख्यमंत्री झाले. 1998 मध्ये अल्पकाळ सुषमा स्वराज यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. त्यानंतर या पक्षाला सलग सहा निवडणुकांमध्ये पराभवाचे झटके सहन करावे लागले. आता तब्बल 27 वर्षांच्या कालावधीनंतर भारताची राजधानी भारतीय जनता पक्षावर प्रसन्न झाल्याचे पहावयास मिळत आहे.
काँग्रेसची हॅटट्रिक : विजयाची आणि शून्याचीही…
ड 1998 ते 2013 या कालखंडात काँग्रेसने सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकून विजयाची हॅटट्रिक नोंदविली होती. तथापि नंतर या पक्षाच्या प्रभावाला ओहोटी लागली. 2015, 2020 आणि आता 2025 या तिन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाला आपले खातेही उघडता आलेले नाही. अशा प्रकारे विजयाची आणि शून्याची अशा दोन्ही हॅटट्रिक्स या पक्षाच्या नावे लागल्या आहेत.
दिग्गज नेते पराभूत
ड या विधानसभा निवडणुकीत केवळ आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे, असे नाही, तर गेल्या 10 वर्षांमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेले दिग्गज नेतेही धाराशायी झालेले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि या पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांचा पराभव पक्षासाठी सर्वात धक्कादायक आहे. केजरीवाल यांचा पराभव भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघात 4 हजारांहून अधिक मतांनी केला. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जंगपुरा मतदासंघात झाला. तर सोमनाथ भारती मालवीय नगरमधून पराभूत झाले आहेत. तर दुर्गेश पाठक राजिंदरनगरमधून अयसस्वी ठरले आहेत.
एक वैचित्र्यपूर्ण योगायोग…
2013 च्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचा नवी दिल्ली मतदारसंघात पराभव करुन ते ‘जायंट किलर’ ठरले होते. आता 12 वर्षांनंतर याच नवी दिल्ली मतदारसंघातून स्वत: केजरीवाल पराभूत झाले आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रवेश वर्मा यांनी आस्मान दाखविले. पण याच मतदारसंघात शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित अप्रत्यक्षरित्या केजरीवाल यांच्या पराभवाला काहीसे जबाबदार ठरले आहेत. कारण, त्यांनी चार हजारांहून अधिक मते घेऊन आपल्या मातेचा पराभव करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाला थोडासा हातभार लावला आहे.
‘आप’च्या 13 जागा काँग्रेसमुळे गेल्या ?
आम आदमी पक्षाच्या 13 जागा काँग्रेसमुळे गेल्या अशी चर्चा आता होत आहे. या पक्षाच्या अनेक दिग्गजांचा पराभवही काँग्रेस उमेदवाराने पराभवाच्या अंतरापेक्षा अधिक मते घेतल्याने झाला, असे आकडेवारीवरुन दिसून येते. त्यांच्यापैकी काही दिग्गजांचे मतदारसंघ पुढीलप्रमाणे देण्यात आले आहेत…
- नवी दिल्ली मतदारसंघ- आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 4 हजार 9 मतांनी पराभूत. काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांना 4 हजार 675 मते मिळाल्याने केजरीवाल यांना फटका.
- मादीपूर मतदारसंघ- आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि विधानसभेच्या उपाध्यक्षा राखी बिडलान 11 हजार 10 मतांनी पराभूत. काँग्रेसचे उमेदवार हनुमान सहाय यांना 17 हजार 958 मते. बिडलान या मंगोलपुरी मतदारसंघातून तीनवेळा विजयी झाल्या होत्या. यावेळी मात्र त्यांचा मतदारसंघ बदलण्यात आला होता.
- राजिंदरनगर मतदारसंघ- आम आदमी पक्षाचे नेते दुर्गेश पाठक यांचा 1 हजार 231 मतांनी पराभव. काँग्रेसचे उमेदवार विनीत यादव यांना 4 हजार 15 मते. दुर्गेश पाठक हे आम आदमी पक्षाच्या राजकीय समितीचे मुख्य नेते आहेत.
- संगम विहार मतदारसंघ- आम आदमी पक्षाचे नेते दीनेश मोहानिया यांचा अवघ्या 316 मतांनी पराभव. काँग्रेसचे उमेदवार हर्ष चौधरी यांना 6 हजार 101 मते. मोहानिया यांना 2016 मध्ये गुन्हेगारी प्रकरणात कारावास. निर्दोष सुटका.
- ग्रेटर कैलाश मतदारसंघ- आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज 3 हजार 188 मतांनी पराभूत. काँग्रेसचे उमेदवार गर्वित सिंघवी यांना 6 हजार 111 मते. सौरभ भारद्वाज पक्षाच्या सर्वात प्रथम नेत्यांपैकी एक. केजरीवालांचे निकवर्तीय.
- जंगपुरा मतदारसंघ- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अवघ्या 675 मतांनी पराभूत. काँग्रेसचे उमेदवार फरहाद सुरी यांना 7 हजार 350 मते. मनीष सिसोदिया यांचा परतपगंज हा मतदारसंघ यावेळी बदलण्यात आला होता.
- मालवीय नगर मतदारसंघ- आम आदमी पक्षाचे महत्वपूर्ण नेते सोमनाथ भारती यांचा 2 हजार 131 मतांनी पराभव. काँग्रेसचे उमेदवार जितेंदर कोचर यांना 6 हजार 770 मते. सोमनाथ भारती पक्षाच्या प्रथम नेत्यांपैकी महत्वपूर्ण.
कारावास भोगलेले सर्व नेते पराभूत
ड तीन वर्षांपूर्वी उघड झालेल्या मद्यधोरण घोटाळ्यात आरोपी असणारे आणि काही महिने कारावास भोगलेले, तसेच अन्य अनेक प्रकरणांमध्ये कारावास भोगलेले आम आदमी पक्षाचे सर्व नेते या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य कारणांसाठी कारावास भोगलेल्या नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी अनेक नेत्यांनी यापूर्वी दोनदा किंवा तीनदा निवडणूक जिंकलेली आहे. दीनेश मोहानिया यांनाही लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपांमुळे कारावास भोगावा लागला होता. मात्र, नंतर त्यांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
Comments are closed.