अभिषेक-संजूनंतर आता ‘हा’ खेळाडू पोहोचला युवराज सिंगपाशी! कारकिर्द धोक्यात, आयपीएलमध्ये बदलणार नशीब?

भारताचे अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांच्या कारकिर्दीमध्ये महत्वाची भुमिका युवराज सिंगने बजावली आहे. तसेच टी२० विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधी संजू सॅमसन यानेही त्याचा पाठिंबा मागितला होता आणि त्याने स्पर्धेत कशी जबरदस्त कामगिरी केली, हे सर्वांनीच पाहिले आहे. टी२० विश्वचषक संपला असून लवकरच आयपीएल २०२६चा हंगाम सुरू होणार आहे. यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतचा युवराजसोबत सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये पंत नेटमध्ये फलंदाजी करताना दिसत असून युवराज तेथे उभा राहून त्याचा सराव पाहत आहे. तसेच त्याला वेळोवेळी सल्लाही देत आहे. त्याच्या या सरावाच्या व्हिडिओमुळे चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सरावावेळी रिषभच्या फलंदाजी तंत्रामध्ये काही बदल झालेले दिसत आहेत. विशेष म्हणजे तो डावखुऱ्या गोलंदाजांविरोधात खुलून फलंदाजी करताना दिसत आहे.
आयपीएल २०२५च्या लिलावामध्ये २७ कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या रिषभची कामगिरी निराशाजनक झाली. त्याने लखनऊचे कर्णधारपद भुषविताना केवळ २६९ धावा केल्या. २०१६ नंतर त्याची ही सर्वाधिक वाईट कामगिरी ठरली. स्पर्धेशेवटी शतकी खेळी केली नसती तर त्यामध्ये त्याची कामगिरी आणखी वाईट ठरली असती.
युवराजने अभिषेक, शुबमन आणि प्रभसिमरन सारख्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. या सर्वांनी लीगमध्ये उत्तम कामगिरी केली. आता रिषभनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले आणि कारकिर्द वाचवण्यासाठी युवराजकडे धाव घेतली. त्याने भारतासाठी आतापर्यंत ३१ वनडे सामने खेळले. त्यामध्ये त्याची सरासरी ३३.५० एवढी राहिली. तसेच त्याने भारताकडून ७६ टी२० सामने खेळले आहेत.
Comments are closed.