आधी होता बस ड्रायव्हर आणि आता भारतीय संघाला मिळवून दिला दुसरा टी20 वर्ल्ड कप, नेमका कोण?

भारत आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६चा विजेता बनला. रविवारी (८ मार्च) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला आणि विक्रमी तिसऱ्यांदा टी२० विश्वविजेते ठरले. या स्पर्धेत भारताच्या १५ खेळाडूंनी वेगवेगळ्या सामन्यांत उत्तम कामगिरी केली, मात्र एक असा व्यक्ती आहे ज्याच्यामुळे संघाने सलग दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला. भारताच्या सपोर्ट स्टाफमधील नुवान सेनेविरत्ने. त्याला भारतीय संघात बव्वा म्हणून ओळखले जाते.
नुवान हा श्रीलंकेचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहे. सध्या तो भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये डाव्या हाताने थ्रो-डाऊन स्पेशालिस्टची जबाबदारी पार पाडत आहे. त्याने भारत टी२० विश्वचषक विजेता बनल्यावर सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोमध्ये नुसान टी२० विश्वचषक ट्रॉफी हातात धरताना दिसत आहे. त्यामध्ये त्याने त्याचे काही अनुभवही शेयर केले आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, २०२३मध्ये या जागेने काही वाईट आठवणी दिल्या. २०२६ मध्ये येथे नव्या आठवणी तयार झाल्या. २०२४ आणि २०२६ सलग दोन टी२० विश्वचषक.
नुवान हा भारताच्या विजयाचा नायक आहे. तो डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांना तयार करतो. तो फलंदाजांना वेगवेगळ्या ऍंगलने आणि व्हेरिएशनने सराव करायला सांगतो. त्याच्या या सततच्या प्रयत्नांमुळे भारतीय फलंदाजी मजबूत झाली आहे. भारताच्या विजयानंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार ऍंजेलो मॅथ्यूज आणि श्रीलंकेच्या माध्यमांनी त्याचे कौतुक केले आहे.
अष्टपैलू मॅथ्यूजने त्याच्या एक्सच्या अकाऊंटवर नुवानचे अभिनंदन केले असून त्याचा फोटो शेयर केला आहे.
नुवानचा जन्म १४ नोव्हेंबर १९७९मध्ये कोलंबोमध्ये झाला. २००४मध्ये त्याने दोन प्रथम श्रेणी सामने खेळले, मात्र त्याची कारकिर्द छोटी राहिली. त्यामुळे त्याने कुटुंबाचे पालन-पोषण करण्यासाठी कोलंबोमध्ये बस चालवली. तो एनसीसी ग्राउंडवर फलंदाजांना प्रशिक्षण देत असे. २०१७च्या दौऱ्यात श्रीलंका दौऱ्यावेळी विराट कोहलीला त्याने नेटमध्ये बॉलिंग केली आणि ते भारतीय संघ व्यवस्थापकांनी पाहिले. त्याच्या थ्रो-डाऊन तंत्राबद्दल खूष झाले आणि त्यानंतर तो २०१८मध्ये भारतीय क्रिकेट संघाशी जोडला गेला. तेव्हापासून तो भारताच्या सपोर्ट स्टाफचा एक अविभाज्य भाग आहे.
थ्रो-डाऊन स्पेशालिस्टचे काम जलद वेगाने चेंडू टाकणे असते. चेंडू टाकण्याच्या यंत्राशिवाय फलंदाजांना अधिक वास्तववादी अनुभव मिळावा यासाठी मानवी पद्धतीचा वापर केला जातो.
Comments are closed.