भारतीय संघाचा खेळ पाहून ग्लेन मॅक्ग्राथ थक्क, मिचेल स्टार्कनंतर केले मोठे विधान!

मागच्या काही दिवसांपूर्वी भारतीय संघाने न्युझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचे नाव कोरले. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघावर विजयानंतर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. खास करून पाकिस्तान आणि इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी आरोप केला आहे, की आयसीसीने दुबईमध्ये भारतीय संघाचे सर्व सामने आयोजित केल्याने भारताला त्याचा फायदा झाला.

भारतीय संघाने त्यांचे सर्व सामने दुबईच्या मैदानावर खेळल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला असे यांचे मत आहे . पण ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मैक्ग्राथच म्हणणं आहे की, श्रेय भारतालाच जातं. या बाकीच्या सगळ्या गोष्टी निव्वळ तोंडाच्या फुकटच्या वाफा आहेत. तो म्हणाला की, भारतीय संघाला दुबईमध्ये खेळण्याचा फायदा झाला या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही.

तसेच याआधी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स म्हणाला होता की, भारतीय संघाला दुबईमध्ये खेळल्याचा फायदा होत आहे. पण मिचेल स्टार्क आणि ग्लेन मैक्ग्राथ‌ यांचं मानणं आहे की, बाकीच्या गोष्टीचा सत्याशी काही संबंध नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार प्रदर्शन केलं आणि या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. ग्लेन मैक्ग्राथ‌ म्हणाला, आम्हाला माहिती आहे भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात नाही आणि ही गोष्ट जगजाहीर आहे. पण यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की भारतीय संघ त्यांचे सर्वसामान्य दुबईमध्ये खेळणार आहे. तुम्हालाही भारतीय संघाला त्यांचे श्रेय द्यायलाच पाहिजे. या संघाने परिस्थितीनुसार खूप चांगलं क्रिकेट खेळलं आहे.

ग्लेन मैक्ग्राथ‌ पुढे म्हणाला, भारतीय संघाला माहीत होते की, दुबईच्या खेळपट्टीवर कोणत्या प्रकारे खेळायचे आहे. त्यामुळे मला नाही वाटत की, भारतीय संघाला एका ठिकाणी खेळण्याचा काही फायदा झाला असेल. तसेच तो असंही म्हणाला की, तुम्ही तेव्हा असं म्हणू शकला असता, जेव्हा भारतीय संघ त्यांचे सर्व सामने भारतामध्ये खेळला असता. याआधी पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी तसेच इंग्लंडच्या नासिर हुसेन, मायकल ऑथरटन आणि ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स यांसारख्या खेळाडूंनी भारतीय संघाने एका ठिकाणी सर्व सामने खेळल्यामुळे त्यांना फायदा झाला होता असे वक्तव्य केले होते.

Comments are closed.