बुडत्या पृथ्वी शॉला महाराष्ट्राचा आधार

‘टीम इंडिया’तून वगळलेला… मुंबई संघाने डच्चू दिलेला…आणि आयपीएलमध्ये दुर्लक्षित राहिलेला…आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉला त्याच्या वाईट काळात अखेर महाराष्ट्राचा आधार मिळालाय. मुंबई क्रिकेट संघटनेचा (एमसीए) निरोप घेतलेल्या या क्रिकेटपटूने आता आगामी हंगामासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी एमसीएच्या निवड समितीने पृथ्वी शॉला संघातून वगळले होते. त्याला वजन कमी करण्याचा सल्लाही देण्यात आला होता. खराब तंदुरुस्तीमुळे तो मुंबईच्या विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी संघाचाही भाग नव्हता. संघ व्यवस्थापनाने त्याला त्याच्या तंदुरुस्तीवर काम करण्याचा सल्ला दिला होता. फिटनेसची समस्या आणि फॉर्ममध्ये नसल्याने पृथ्वी शॉला ‘टीम इंडिया’तून वगळण्यात आले होते. त्यामुळे पृथ्वी शॉ उर्वरित कारकीर्द वाचविण्यासाठी अलीकडेच फिटनेसवर काम करताना दिसत आहे.
पृथ्वी शॉने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. शॉच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने 2018 साली 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 13 शतके आणि 4500 हून अधिक धावा आहेत.
‘कारकिर्दीतील या वळणावर मी एक क्रिकेटपटू म्हणून स्वतःच्या कारकिर्दीच्या विकासासाठी महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएकडून आजवर मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो. आता महाराष्ट्राकडून खेळताना माझ्या कारकिर्दीला नवे वळण मिळेल व क्रिकेटपटू म्हणून अधिक प्रगती करू शकेन. तसेच ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, रजनीश गुर्बानी आणि मुकेश चौधरी यांसारख्या गुणवान खेळाडूंसोबत महाराष्ट्र संघात खेळण्याची संधी मिळेल याचा मला आनंद आहे.’ – पृथ्वी शॉ
Comments are closed.