मतदार यादीतील घोळाची नेमकी गडबड काय? मतचोरीचे प्रकरण तापत चालले, आयोगाने मागवला जिल्हाधिकाऱयांकडून अहवाल

महाराष्ट्रातल्या मतदारयाद्यातील घोटाळय़ाची विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कुंडली मांडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे धाबे दणाणले. मतदारयादीतील वयाचा, निवासी पत्त्यापुढे शून्य, एकाच मतदाराची सहा ठिकाणी नावे, एकाच घरात शेकडो मतदारांचे वास्तव्य हा सर्व घोळ पुढे आल्यावर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मतदारयादीत नेमकी काय गडबड आहे याचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत.
मतदारयादीतील घोळ आणि गडबड घोटाळ्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मतदारयादीतील त्रुटीचे पुरावे दिले. दुबार मतदार, चुकीचे पत्ते, निवासी पत्त्याच्या पुढे निरंक(शून्य) असा उल्लेख, वयाचा घोळ, एकाच घरात अनेक मतदारांचे वास्तव्य असे अनेक पुरावे निवडणूक आयोगाला सादर केले.
सर्वपक्षीय शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या या आक्षेपांची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचे धाबे दणाणले. अखेर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यातील जिल्हाधिकारी व स्थानिक निवडणूक कार्यालयांना पत्र पाठवले आहे. मतदारयादीतील वयाचा गोंधळ, घराच्या पत्त्यावर शून्य नोंद, एका घरात अनेक मतदारांचे वास्तव्य यासंदर्भात टीव्ही चॅनेलवर आणि वर्तमानपत्रात आलेल्य बातम्यांबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठवण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत.
मतदार यादीतील त्रुटींचे पुरावे
मतदार यादीत अनेक दोष असल्याचे पुराव्यासह निवडणूक आयोगाच्या बैठकीत मांडण्यात आले. साडेचौदा लाख मतदार वाढले आहेत; पण त्यातील अनेकांच्या घरांचे पत्ते नसल्याची वस्तुस्थिती मांडण्यात आली. काही मतदारांचे वय 123 दाखवण्यात आले आहे. मुलापेक्षा वडिलांचे वय कमी दाखवण्यात आले आहे. नाशिकमध्ये एकाच घरात 813 मतदारांची नोंद असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणले आहे.
Comments are closed.