India vs Pakistan: पुन्हा एकदा आमनेसामने येणार भारत-पाकिस्तान; ‘या’ देशात रंगणार कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील थरार!

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे (India and Pakistan) संघ क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचे संघ मैदानावर उतरणार आहेत. यावेळी दोन्ही देशांचे संघ हॉकी वर्ल्ड कपसाठी मैदानात आमनेसामने असतील.
रिपोर्ट्सनुसार, 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाणारा हॉकी विश्वचषक बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये आयोजित केला जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेदरलँड्समध्ये होतील. दोन्ही संघांना पुरुष गटातील ‘पूल डी’ मध्ये ठेवण्यात आले असून, याच गटात इंग्लंड आणि वेल्सचे संघदेखील समाविष्ट आहेत.
हॉकीमध्ये भारत आणि पाकिस्तानची यापूर्वीची लढत 2024 च्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झाली होती. या सामन्यात भारताने 2-1 असा विजय मिळवला होता. तर त्याआधी 2023 च्या एशियन गेम्समध्ये दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते, ज्यामध्ये भारताने 10-2 अशा मोठ्या फरकाने विजय आपल्या नावावर केला होता. 2025 चा हॉकी आशिया चषक भारताच्या यजमानपदाखाली खेळवला गेला होता, परंतु पाकिस्तानने सुरक्षेचे कारण देत या स्पर्धेतून नाव मागे घेतले होते. यामुळे गेल्या वर्षी दोन्ही संघांमध्ये सामना होऊ शकला नव्हता.
जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकी सामन्यांची हेड टू हेड आकडेवारी पाहिली, तर पाकिस्तान बराच पुढे असल्याचे दिसून येते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 181 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने आघाडी घेत 82 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर भारताने 67 सामने आपल्या नावावर केले आहेत. दोन्ही संघांमधील 32 सामने ड्रॉ (अनिर्णित) झाले आहेत. यासोबतच वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तान बराच पुढे आहे. पाकिस्तानने आतापर्यंत पाच वेळा वर्ल्ड कपचे जेतेपद पटकावले आहे, तर भारताने केवळ एकदाच हे जेतेपद मिळवले आहे.
पाकिस्तान हेड टू हेड आणि वर्ल्ड कप विजयात जरी भारतापेक्षा पुढे असला, तरी 2016 पासून भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. गेल्या साधारण 10 वर्षांत भारताने पाकिस्तानविरुद्धचे जास्तीत जास्त सामने जिंकले आहेत.
Comments are closed.