विराट-सचिनपासून सुंदर पिचाईंपर्यंत टीम इंडियाच्या विश्वविजयानंतर कोणत्या दिग्गजाने काय म्हटलं?
हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी इतिहास रचला. संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. याआधी भारत दोन वेळा (2005 आणि 2017) अंतिम फेरीत पोहोचला होता, पण विजेतेपद हाती येऊ शकलं नव्हतं. आता मात्र टीम इंडियाने चॅम्पियन बनत देशाला अभिमानाची अनुभूती दिली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली, सुंदर पिचाई, सचिन तेंडुलकर, आणि मिताली राजसह अनेक दिग्गजांनी संघाचं अभिनंदन केलं आहे.
विराट कोहलीने आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर लिहिलं, आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी कामगिरी! तुम्ही निर्भयपणे आणि आत्मविश्वासाने खेळून प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढवला आहे. तुम्ही सगळ्याच जणी प्रशंसेच्या पात्र आहात. या क्षणाचा मनमुराद आनंद घ्या. हरमन आणि संपूर्ण टीमला सलाम! जय हिंद!
माजी कर्णधार मिताली राज वर्ल्ड कप फायनलच्या वेळी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवरच होत्या. त्या भावूक झाल्या आणि भारताच्या विजयाचा ट्रॉफीसह जल्लोष साजरा केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, विश्वविजेता भारत! दोन दशकांहून अधिक काळ मी हे स्वप्न पाहिलं होतं की, भारतीय महिला संघाला विश्वचषक ट्रॉफी उचलताना पाहावं. आज ते स्वप्न साकार झालं. 2005 च्या निराशेपासून 2017 च्या संघर्षापर्यंतचा प्रत्येक अश्रू, प्रत्येक त्याग, आणि त्या प्रत्येक तरुणीचं धाडस ज्यांनी मनोमन विश्वास ठेवला की आम्हीही हे करू शकतो. या क्षणाने सार्थ ठरवलं आहे. नवीन विश्वविजेत्यांनो, तुम्ही फक्त एक ट्रॉफी नाही जिंकलीत, तर भारतीय महिला क्रिकेटसाठी धडकणारं प्रत्येक हृदय जिंकलंत. जय हिंद!
‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर यांनी लिहिलं, 1983 ने एका संपूर्ण पिढीला मोठी स्वप्नं पाहायला आणि ती पूर्ण करायला शिकवलं. आज आपल्या महिला संघाने काहीतरी तसंच खास करून दाखवलं आहे. त्यांनी देशभरातील असंख्य मुलींना बॅट आणि बॉल हातात घेऊन मैदानात उतरायला आणि एक दिवस त्या ट्रॉफी उचलू शकतात हा विश्वास देऊन प्रेरित केलं आहे. हा भारतीय महिला क्रिकेटच्या प्रवासातील ऐतिहासिक टप्पा आहे. शाबास टीम इंडिया, तुम्ही संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला आहे.
सुंदर पिचाई यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, महिला विश्वचषकाचा अंतिम सामना खरोखरच रोमांचक होता. 1983 आणि 2011 च्या आठवणी ताज्या झाल्या. टीम इंडियाचं अभिनंदन! मला खात्री आहे की, हा विजय एका नव्या पिढीला प्रेरणा देईल. दक्षिण आफ्रिकेलाही उत्कृष्ट स्पर्धेसाठी शुभेच्छा!
Comments are closed.