थलपती विजय नंतर आता ज्युनिअर एनटीआरची राजकारणात एन्ट्री?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून कानावर येत होत्या. परंतु या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता 18 जुलै रोजी एका मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, आता त्याच्या अधिकृत टीमने याबाबत स्पष्ट भूमिका मांडत या सर्व दाव्यांचे खंडन केले आहे.

ज्युनिअर एनटीआरच्या टीमने जारी केलेल्या निवेदनानुसार, 18 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा राजकीय अजेंडाशी संबंधित नाही. या कार्यक्रमात ‘ऊरु वाडा’ या नव्या सामाजिक उपक्रमाची घोषणा केली जाणार आहे. या मोहिमेचा उद्देश समाजसेवा, तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहोचवणे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवणे हा आहे. असे वृत्त लोकमत ने दिले आहे.

ज्युनिअर एनटीआरच्या टीमने चाहत्यांना आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच या सामाजिक उपक्रमाला राजकीय रंग देऊन दिशाभूल करणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट शेअर करू नयेत, अशी विनंतीही करण्यात आली आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, ‘ऊरु वाडा’ हा पूर्णपणे अराजकीय सामाजिक उपक्रम आहे.

दरम्यान, ज्युनिअर एनटीआर सध्या दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या ‘ड्रॅगन’ या बहुप्रतीक्षित ॲक्शन थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. होम्बले फिल्म्सच्या निर्मितीखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून चाहत्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, ज्युनिअर एनटीआरने अलीकडेच हृतिक रोशनसोबत ‘वॉर 2’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. सध्या त्याच्या आगामी चित्रपटांबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Comments are closed.