‘एलसीबी’चा कर्मचारी गुजरच्या बडतर्फीनंतर आता प्रभारी ‘रडार’वर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचा (एलसीबी) कर्मचारी शामसुंदर गुजर याने जप्त केलेल्या ड्रग्जची विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला तत्काळ बडतर्फ करण्यात आले. मात्र, जप्त मुद्देमालावर देखरेख ठेवणाऱया एलसीबीच्या निरीक्षकांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत या प्रकरणातील साखळी उघडकीस येण्याची गरज अधोरेखित केली. जर वरिष्ठ अधिकारी सहभागी असतील, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे; अन्यथा पोलीस प्रशासनात वचक बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात कारवाई केल्यानंतर अहिल्यानगर एलसीबीत कार्यरत असलेल्या गुजरचा यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनीच जप्त केलेले ड्रग्ज त्याने मुद्देमाल कशातून चोरून विक्री केल्याचे पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आले. येथील पोलीस मुख्यालयात असलेल्या मुद्देमाल कक्षात जप्त ड्रग्ज ठेवले जात होते. त्याची जबाबदारी गुजर सांभाळत होता. मात्र, या मुद्देमाल कक्षाचे प्रमुख म्हणून एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्यावर जबाबदारी होती. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मुद्देमाल कक्षाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर गुजर याने मुद्देमाल कक्षातून ड्रग्ज विक्री केल्याचे चौकशीतून समोर आले. यानंतर निरीक्षक कबाडी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुजर विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आमदार ओगले यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, गुजरला कोणाचे पाठबळ होते का? या प्रकरणातील साखळी उघडकीस येण्याची गरज आहे. एलसीबीच्या निरीक्षकांवरदेखील कारवाई होणे आवश्यक आहे; अन्यथा पोलीस प्रशासनात वचक बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मदत केली असेल तर कारवाई – फडणवीस

??आमदार ओगले यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, जर वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणत्याही प्रकारे ड्रग्ज प्रकरणात संरक्षण देत असतील किंवा मदत करत असतील, तर कोणत्याही पदावर असला तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या स्पष्टीकरणानंतर ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात एलसीबीचे निरीक्षकदेखील चौकशीच्या फेऱयात येण्याची शक्यता आहे.

Comments are closed.