सत्तास्थापनेचा खेळ सुरू, महापौर पदाचे आरक्षण गुरुवारी
महानगरपालिका निवडणुकीनंतर राज्यात आता सत्तास्थापनेचा खेळ सुरू झाला आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्वच महापालिकांत महापौर पदासाठी राजकीय पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवार 22 जानेवारी रोजी काढण्यात येणार हे आज स्पष्ट झाल्याने धाकधूक वाढत चालली आहे. मुंबईत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी शिंदे गटाच्या हॉटेल पॉलिटिक्समुळे भाजपनेदेखील सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याच वेळी कल्याण-डोंबिवलीत शिंदेना रोखण्याचा प्लॅन कमळाबाईकडून आखला जात असून ठाण्याच्या महापौर पदावर दावा सांगत शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौर पदाबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत शिंदे गटाच्या नगरसेवकांची हॉटेल ताज लँड्स एंडमधून सुटका होण्याची शक्यता नाही.
भाजप आणि शिंदे गटाने मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी महापालिकांत महायुती करून निवडणुका लढविल्या असल्या तरी महापौर कोण? आणि सत्तेच्या वाटपावरून दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षात पह्डापह्डीच्या राजकारणात माहीर असणाऱ्या भाजपकडून कोणताही धोका होऊ नये याची खबरदारी शिंदे गटाकडून पहिल्याच दिवसापासून घेण्यात येत आहे. शिंदे गट मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत सहजासहजी राजी झाला नाही, तर काय करायचे याचे आडाखे बांधण्यास भाजपकडून सुरुवात झाली आहे. मुंबईतील सत्तास्थापनेवर राज्यातील अन्य महापालिकांत सत्तेचा खेळ रंगणार आहे. यातून नव्या आघाडय़ा व युत्या आकारास येण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाला नगरसेवक फुटण्याची धास्ती
सत्तेतील वाटय़ासाठी शिंदे गटाकडून भाजपसोबत दबावाचे राजकारण सुरू आहे. या खेळात आपलेच नगरसेवक फुटण्याची धास्ती शिंदे गटाला असल्याने त्यांना वांद्रे येथील ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आले आहे. महापौर पदाची निवडणूक होत नाही तोपर्यंत हे हॉटेल पॉलिटिक्स नेमके कोणती वळणे घेते हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
शिंदे-चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला
कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खूपच प्रतिष्ठsची केली होती. यासाठी बिनविरोध नगरसेवक करण्याचा डाव त्यांनी टाकला. त्यानंतरही 62ची मॅजिक फिगर त्यांना गाठता आली नाही. भाजप 50 जागांवर मर्यादित राहिला. शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चव्हाण कोणती आणि चव्हाण डोईजड होऊ नये यासाठी शिंदे गटाकडून कोणते डावपेच आखले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचे राज्यातील नेते दिल्लीत
मुंबईत महापौरपदावरून वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना भाजपचे राज्यातील प्रमुख नेते मात्र आज दिल्लीत होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिल्लीत गाठीभेटी घेतल्या. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी आज बैठक होती. त्या बैठकीसाठी महाराष्ट्रातून हे प्रमुख नेते दिल्लीत गेले आहेत. दरम्यान, या दिल्लीवारीत रवींद्र चव्हाण हे पालिका निवडणुकीनंतरच्या राजकीय स्थितीवर पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करतील, असे सांगण्यात येत आहे.
g सत्तास्थापनेसाठी आठ ते दहा दिवस लागण्याची शक्यता आहे. महापौर पदाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणीही शहर सोडू नका, असे फर्मान भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांना काढले आहे.
मुंबईसाठी ठाण्यात कुरघोडीचे राजकारण
महायुती म्हणून निवडणुका लढलो त्यामुळे मुंबईत महायुतीचाच महापौर होईल, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात भाजपने दोन वर्षांसाठी महापौर पदावर दावा ठोकला. भाजपने मुंबईसाठी ठाण्यात शिंदे गटाबरोबर कुरघोडीचे राजकारण सुरू केल्याची चर्चा आहे.
g नगरविकास विभागाकडून राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला मंत्रालयात काढली जाणार आहे. सकाळी 11 वाजता सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात चिठ्ठय़ा टाकून सोडतीची प्रक्रिया नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले.
अशी काढली जाणार लॉटरी
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, खुला वर्ग असे आरक्षण असेल. ते काढल्यानंतर पुन्हा
पन्नास टक्के महिला आरक्षण काढणार.
आरक्षणाची सोडत काढताना संबंधित महापालिकेत यापूर्वी जे आरक्षण होते ते वगळून अन्य आरक्षण प्रवर्गांच्या चिठ्ठय़ा काढल्या जाणार आहेत.
आरक्षण प्रवर्गांच्या सर्व चिठ्ठय़ा पेटीमध्ये टाकण्यापूर्वी उपस्थित सर्वांना दाखवल्या जातील.
महानगरपालिकेचे नाव पुकारून पेटीतून एक चिठ्ठी काढली जाईल. त्या प्रवर्गातील महापौरच संबंधित महापालिकेवर विराजमान होईल.
सर्व महापौर आरक्षणाच्या चिठ्ठय़ा काढल्यानंतर पालिकांच्या नावांच्या चिठ्ठय़ा पेटीत टाकून त्यातून 50 टक्के महिला आरक्षणाच्या चिठ्ठय़ा काढणार.
Comments are closed.