पडद्याआडून – ‘करुणाष्टके’ गोष्ट उंबरठ्यापलीकडची

>> पराग खोत

‘संगीत देवबाभळी’नं पारंपरिक नाटकाच्या चौकटीतून बाहेर पडून एक मुक्त संकल्पना मांडली आणि रसिकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला. आता या नाटकाची हजाराव्या प्रयोगाकडे घोडदौड सुरू आहे. ‘संगीत देवबाभळी’नंतर काय, हा प्रश्न जेव्हा लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांना पडला त्यावेळी त्यांना तितकीच सशक्त संकल्पना मांडणारं, वेदनेच्या मुळाशी जात प्रबोधन करणारं काहीतरी अभिप्रेत असावं. म्हणूनच तब्बल आठ वर्षांच्या अभ्यास आणि संशोधनातून प्रकटलेलं, उंबरठय़ापलीकडची गोष्ट सांगणारं ‘करुणाष्टके’ रंगभूमीवर दाखल झालंय.

19व्या शतकातील कर्मठ रूढी आणि चालीरीती यांच्या बळी ठरलेल्या तत्कालीन स्त्रियांची मानसिक आणि भावनिक आंदोलने अचूक टिपणारं हे नाटक आहे. लग्नानंतर वयाच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर वैधव्य आलेल्या सात स्त्रियांची ही कहाणी. कुंपू, मंगळसूत्र आणि केस या बाह्य गोष्टींसोबतच तारुण्यसुलभ भावना, शरीर संवेदना आणि जगण्याची ऊर्मी या आंतरिक गोष्टी बळजबरीने हिरावून घेतलेल्या स्त्रियांची ही प्रातिनिधिक गोष्ट. पण समाजाने दाबून टाकलेल्या या स्त्रिया दुर्बल आहेत असं नाही. विद्रोह हा या नाटकाचा गाभा आहे. त्यामुळे या प्रथा उचित आहेत असं मानणारी ‘बाई बाई’ आणि त्या मोडून टापू पाहणारी ‘दुर्गा’ या दोन टोकाच्या व्यक्तिरेखा एकमेकांसमोर सशक्तपणे उभ्या राहतात. या दोघांमधील वैचारिक संघर्ष कडवा आहे, प्रसंगी तो हिंस्र होतो; परंतु आपल्या मतांशी प्रामाणिक असणाऱया आणि त्यासाठी लढा देणाऱया या दोघीही नाटकाच्या नायिका आहेत.

लाल आलवणाखाली, भादरलेलं डोकं आणि पुरतडलेलं मन घेऊन जगणाऱया विधवांचं विदारक चित्रण इथे असलं तरी त्यांची आपापसातली थट्टामस्करी आणि मन रिझविण्यासाठी केलेली धडपड विरंगुळा निर्माण करते. सोबतच स्त्री पुरुष संबंधांचे काही वेगळे पदर हे नाटक उलगडते. या नाटकातली भाषा वैशिष्टय़पूर्ण आहे. प्रसंगी संवाद अंगावर येतात, पण ‘बिटविन द लाइन्स’मधूनही बऱयाच संवेदना प्रेक्षकांपर्यंत अलवार पोहोचवल्या जातात. नाटकातल्या प्रत्येकीची एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या स्वभावाला जशी एक ठाशीव पार्श्वभूमी आहे तसाच वैचारिक गोंधळसुद्धा आहे. त्या काहीतरी शोधू पाहतायत. समाजाने वाळीत टाकल्यावर त्या समाजावर आसुड ओढण्याची आपली क्षमता त्या चाचपून बघतायत आणि शेवटी दुर्गेचं नेतृत्व लाभल्यावर त्या निर्णायकपणे तिच्या बाजूने उभ्या राहतात.

‘संगीत देवबाभळी’सारखंच हे नाटक ज्याचं त्याने अनुभवायला हवं. त्याचा आपल्या मगदुराप्रमाणे अर्थ लावायला हवा. हे नाटक हळूहळू आपल्या आत झिरपत जातं. सुरुवातीला काहीसं संथ वाटणारं, पण नंतर संघर्षबिंदूकडे वेगानं प्रवास करत असताना आपल्या अंगावर सरसरून काटा आणणारं काहीतरी. प्राजक्त देशमुख म्हणतात, की जोपर्यंत मला पटत नाही, भावत नाही तोपर्यंत मी ते नाटक करत नाही. ते नेमकं काय म्हणतायत याची अनुभूती हे नाटक पाहताना येते. हे नाटक त्यांनी वेगळय़ा फॉर्ममध्ये बसवलंय. दुसऱया अंकासाठी जेव्हा पडदा उघडतो त्यावेळचं गाणं आणि दृश्य विलोभनीय आणि आकर्षक, अगदी न चुकवण्यासारखं. गीतांजली पुलकर्णी आणि पर्ण पेठे यांनी अनुक्रमे ‘बाई बाई’ आणि ‘दुर्गा’ या दोन मध्यवर्ती व्यक्तिरेखा ताकदीने उभ्या केल्या आहेत. त्यांना केतकी सराफ, कल्याणी मुळे, माधुरी भारती, किरण खोजे आणि प्रतीक्षा खासनीस यांनी तितकीच मोलाची साथ दिलीय. माधव आणि इतर काही भूमिका साकारणाऱया विनायक चव्हाण यांचं काwतुक करायलाच हवं. आनंद ओक यांचं संगीत दमदार, सचिन गावकर यांचं नेपथ्य देखणं आणि प्रफुल्ल दीक्षित यांची प्रकाशयोजना अनुरूप आहेच.

नुकताच भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्यांचं कौतुक करत असतानाच, ज्या स्त्रियांनी त्यांच्या आजच्या लेकाRच्या स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली आणि अनिष्ट चालीरीती मोडण्यासाठी बंडाचे निशाण रोवले त्या सर्व अनामिक वीरांगनांच्या लढय़ाचे चित्रण करणारे ‘करुणाष्टके’सारखे सशक्त नाटक रंगभूमीवर यावे हा उत्तम योग आहे. हे धाडस करणाऱया लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख आणि नेहमी चाकोरीबाहेरची नाटकं देणाऱ्या भद्रकाली प्रॉडक्शन्सचे प्रसाद कांबळी यांचं काwतुक!

  • लेखक, दिग्दर्शक : प्राजक्त देशमुख
  • नेपथ्य : सचिन गांवकर
  • संगीत : आनंद ओक
  • प्रकाशयोजना : प्रफुल्ल दीक्षित
  • रंगभूषा : सचिन वारीक
  • वेशभूषा : आशिष देशपांडे
  • नृत्य : संजुक्ता वाघ
  • दिग्दर्शन सहाय्य : प्रणव सपकाळे
  • निर्माती : कविता मच्छिंद्र कांबळी

कलाकार: पर्ण पेठे (दुर्गा), कल्याणी मुळे (देवकी), केतकी सराफ (गोदाक्का), माधुरी भारती (शांता), किरण खोजे (सिंधू), प्रतीक्षा खासनीस (यमी), विनायक चव्हाण (माधव व विविध भूमिका) आणि बाई बाई (गीतांजली कुलकर्णी)

Comments are closed.