मतांच्या चोरीनंतर आता पेट्रोलची चोरी
इथेनॉलमीश्रित पेट्रोलवरून राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारकडून पेट्रोलची चोरी होत असल्याचा आरोप केला. त्यांनी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याच्या मोदी सरकारच्या धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असूनही, ग्राहकांना त्याबद्दल योग्य माहिती दिली जात नाही, असा आरोप त्यांनी केला.
कर्नाटक सरकारने सात जिह्यांमध्ये पेट्रोलच्या नमुन्यांची केलेल्या तपासणीचा हवाला देत राहुल यांनी 14 पैकी 11 नमुन्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल आढळल्याचे म्हटले आहे. ही बाब सर्वसामान्यांच्या खिशाला आणि त्यांच्या वाहनांनाही हानी पोहोचवणारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटक सरकारने सात जिह्यांमधून पेट्रोलचे 14 नमुने गोळा करून मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये त्यांची चाचणी केली. यापैकी 11 नमुन्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉलचे प्रमाण आढळले. इंडियन ऑइलच्या एका नमुन्यात 31.2 टक्के आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या एका नमुन्यात 30.5 टक्के इथेनॉल आढळले. तथापि, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी या चाचणी निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नमुन्यांची चाचणी विहित कायदेशीर आणि तांत्रिक मानकांनुसार केली गेली नसल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे.
केंद्र सरकारने आरोप फेटाळले
केंद्र सरकारने इथेनॉलच्या अतिरिक्त मिश्रणाचे दावे फेटाळून लावले. काँग्रेसच्या आरोपांनंतर केंद्र सरकारने याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. शनिवारी सरकारने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावताना संबंधित सर्व नमुने चाचणीत उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट केले.देशव्यापी गुणवत्ता नियंत्रण मोहिमेअंतर्गत कर्नाटकातून गोळा केलेले सर्व 56 नमुने निर्धारित मानकांची पूर्णपणे पूर्तता करतात, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले.
Comments are closed.