सूर्यकुमार यादवने व्यक्त केली कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा; ‘या’ फॉरमॅटमध्ये आपला हात सेट असल्याचंही केलं मान्य

सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav under captaincy) नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून टी20 वर्ल्ड कप 2026 वर नाव कोरले. मार्च 2021 मध्ये टी-20 मधून पदार्पण करणाऱ्या सूर्याने अल्पावधीतच वनडे आणि कसोटी संघातही स्थान मिळवले होते. मात्र, टी-20 सारखे यश त्याला तिथे मिळाले नाही आणि तो या दोन्ही फॉरमॅटमधून बाहेर झाला. सध्या सूर्या भारतीय टी-20 संघाचा कर्णधार असून तो फक्त याच फॉरमॅटमध्ये खेळतो. तरीही, त्याला आजही कसोटी क्रिकेट खेळण्याची ओढ आहे.

पीटीआयला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत सूर्याने स्पष्ट केले की, वनडे हा त्याचा आवडता फॉरमॅट नाही, पण टी-20 वर त्याचा हात चांगला बसला आहे. तो म्हणाला, नशिबात जे लिहिले असते तेच मिळते.

सूर्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात कसोटी क्रिकेटने केली होती. मुंबईसाठी त्याने 10-12 वर्षे रणजी ट्रॉफी खेळली आहे. तो म्हणाला की, सुरुवात कसोटी क्रिकेटने झाल्यामुळे सर्व काही त्याभोवतीच फिरत होते, पण नंतर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटकडे कल वाढत गेला. त्याने मान्य केले की, त्याने वनडेमध्ये चांगली कामगिरी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिथे त्याला यश मिळाले नाही. दुसरीकडे टी-20 मध्ये मात्र त्याने स्वतःचे स्थान पक्के केले.

जेव्हा त्याला विचारण्यात आले की संधी मिळाली तर कसोटी खेळणार का? तेव्हा तो म्हणाला, खूपच आनंद होईल! 2010 ते 2020 असे 10 वर्षे मी कसोटी क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे त्या फॉरमॅटवर माझे प्रेम आहे आणि कसोटी खेळायला कोणाला आवडणार नाही?

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत फक्त एक कसोटी सामना खेळला आहे (2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध), ज्यात तो अपयशी ठरला होता. तसेच 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्येही तो फारशी चमक दाखवू शकला नव्हता. तेव्हापासून तो वनडे आणि कसोटी संघाबाहेर आहे, पण टी-20 चा तो बादशहा ठरला आहे.

Comments are closed.