‘मागच्या चुकांमधून..’, ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा टी-20 जिंकल्यानंतर काय म्हणाला अक्षर पटेल?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात आपल्या सर्वांगीण कामगिरीने सर्वांना प्रभावित करणारा भारतीय खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) म्हणाला की, त्याने आपल्या मागील चुका लक्षात ठेवून त्यातून धडा घेतला आणि सीमेच्या आकाराचा परिणाम आपल्या शॉट निवडीवर होऊ दिला नाही.

अक्षरने 11 चेंडूंमध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावून नाबाद 21धावा केल्या. शेवटच्या षटकात त्याने मार्कस स्टॉइनिसच्या सलग चेंडूंवर चौकार आणि षटकार मारत टीमचा स्कोर 167 धावांपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली.
गोलंदाजी करतानाही अक्षरने 2 विकेट घेतल्या. भारताने हा सामना 48 धावांनी जिंकत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.

‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेल्या अक्षरने ‘BCCI TV’शी बोलताना सांगितले,मला माहिती होतं की परिस्थिती कठीण असेल, कारण सतत विकेट पडत होत्या. ड्रेसिंग रूममधून मला स्पष्ट संदेश मिळाला होता की, शेवटपर्यंत क्रीजवर टिकून राहायचं, कारण माझ्यानंतर कोणताही फलंदाज उरला नव्हता.

31 वर्षीय या अक्षर पटेलने पुढे सांगितले,मी विचार केला की शेवटच्या षटकात थोडा धोका घ्यावा. साइड बाउंड्री मोठी होती, पण जर मी माझी लय टिकवून ठेवली आणि चेंडूवर नीट लक्ष दिलं, तर मी तो सीमारेषेबाहेर पाठवू शकतो, असं मला वाटलं.

अक्षर पुढे म्हणाला, यापूर्वी मी अनुभव घेतला होता की, जेव्हा मी बाउंड्रीच्या अंतराचा विचार करायचो, तेव्हा त्या दिशेला शॉट खेळतच नव्हतो. त्यामुळे आधीपासून ठरवलेले शॉट्स फसत आणि चुका व्हायच्या. या वेळेस मी मागील चुका सुधारल्या आणि माझ्या शॉट निवडीत सुधारणा केली.

मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना शनिवारी ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे.

Comments are closed.