ऑस्ट्रेलियात टी20 मालिका जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोहसिन नक्वींना टोला! जाणून घ्या नेमकं काय म्हणाला

टी20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटचा कर्णधार झालेल्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सलग 5 टी20 मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला. नक्वी हे तेच अधिकारी आहेत जे भारताने जिंकलेल्या आशिया कप ट्रॉफीसह निघून गेले होते.

सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेला अभिषेक शर्मा सोबत आला होता, ज्याला मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित करण्यात आले. पत्रकारांनी सूर्याकुमारला विचारलं, ट्रॉफी हातात घेताना कसं वाटलं?त्यावर सूर्यानं हलक्या फुलक्या अंदाजात उत्तर दिलं, ट्रॉफी हातात घेऊन खूप छान वाटलं.

हे वक्तव्य नक्वींवर केलेला एक सूचक कटाक्ष होता. कारण, भारताने आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद मिळवलं होतं, पण त्यानंतर मोहसिन नक्वींनी ती ट्रॉफी स्वतःसोबत नेली होती. इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असं घडलं की विजेत्या संघाला ट्रॉफी दिली गेली नाही.

पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाला, शेवटी ट्रॉफीला स्पर्श करून खूप आनंद झाला. जेव्हा मालिकेची ट्रॉफी मला दिली गेली, तेव्हा ती हातात घेतल्यावर एक वेगळीच भावना होती. काही दिवसांपूर्वी आपल्या महिला संघाने विश्वचषक जिंकून ती ट्रॉफी भारतात आणली आहे. आता ही ट्रॉफीही आपल्या घरी आली आहे, त्यामुळे खूप समाधान वाटतं.

टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले, आमची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याशी भेट झाली. आशिया कप ट्रॉफी हा अधिकृत चर्चेचा विषय नव्हता, त्यामुळे आयसीसीने नक्वींसोबत स्वतंत्र बैठक आयोजित केली होती. आम्ही आयसीसीचे आभार मानतो की त्यांनी हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केला. दोन्ही बाजूंकडून मैत्रीपूर्ण चर्चा झाली आणि हे प्रकरण लवकरात लवकर मिटवण्याची दोन्हींची इच्छा आहे.

Comments are closed.