हिटमॅनचा धमाका, 38 व्या वर्षी रोहित शर्मा वन डे रँकिंगमध्ये अव्वल

वय फक्त आकडा असतो, हे आता रोहित शर्माने प्रत्यक्ष दाखवून दिलेय. 38 वर्षे 182 दिवसांच्या वयात हिंदुस्थानचा हा माजी कर्णधार आता जगातील सर्वात वयोवृद्ध अव्वल फलंदाज ठरला आहे. आयसीसी क्रमवारीत शिखरावर चढताना त्याने स्वतःच्या साथीदाराला शुभमन गिलला मागे टाकत पहिल्यांदाच आपल्या कारकीर्दीत हा बहुमान मिळवला आहे.

अ‍ॅडलेड ते सिडनी हिटमॅनचा कहर!

ऑस्ट्रेलियन भूमीवर सध्या रोहितची बॅट म्हणजे कांगारूंसाठी विजेचा झटकाच!

अ‍ॅडलेडमध्ये 97 चेंडूंत 73 धावांची संयमी खेळी करून त्याने पाया घातला आणि सिडनीत तर जणू काही धावांचा पाऊसच पाडला. 125 चेंडूंत नाबाद 121 धावा. या दोन खेळींनी त्याला थेट रँकिंगच्या टॉपवर पोहोचवले. त्याचे गुण 745 वरून 781 वर गेले आणि गिलला मागे टाकत त्याने सिंहासन काबीज केले.

गिल आणि कोहलीचे थोडे मागे पाऊल

शुभमन गिलचा फॉर्म अलीकडे थोडा मंदावला आहे. त्याने तीन सामन्यांत 10, 9 आणि 24 अशीच छोटी खेळी केली, त्यामुळे तो आता तिसऱया स्थानावर गेला आहे. विराट कोहलीने सिडनीत 74 धावा केल्या, पण रँकिंगत तो एक पायरी घसरून सहाव्या स्थानावर आला.

श्रेयस अय्यरची जागा स्थिर आहे

हिंदुस्थानी फलंदाजीसाठी अजून एक गोड बातमी म्हणजे श्रेयस अय्यरनेही आपली सातत्यपूर्ण कामगिरी टिकवली असून त्याच्या क्रमवारीत एका स्थानाची सुधारणा झाली आहे. तो आता दहावरून नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

सचिन, धोनी, विराटनंतर आता ‘हिटमॅन’!

हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात वन डे रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा रोहित हा पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याआधी हे यश मिळाले होते सचिन तेंडुलकर, एम. एस. धोनी, विराट कोहली, आणि शुभमन गिल या दिग्गजांना. म्हणजे आता या सुवर्णसूचीत ‘रोहित’ नावाने एक नवे पान जोडले गेले आहे आणि ते वयाच्या 38 व्या वर्षी!

Comments are closed.