समाजभान – एक लढा वार्धक्याशी
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]
समाजातील ज्येष्ठ वृद्ध व्यक्तींना सन्मानपूर्वक आणि आनंदी ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. मात्र सध्या समाजात सर्वात दुर्लक्षित घटक वृद्धच आहेत.
ऑक्टोबर हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय वृद्धांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. कशासाठी? कारण समाजात सर्वात दुर्लक्षित घटक वृद्ध आहे. वृद्धांकडे लक्ष वेधण्यासाठी याच दिवशी नाही, तर वर्षभर सर्वांनी आठवण ठेवावी. समाजातील ज्येष्ठ वृद्ध व्यक्तींना सन्मानपूर्वक आणि आनंदी ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. म्हणूनच हा लढा वार्धक्याशी आहे.
`Stand against Ageism’ हे प्रत्येकासाठी आव्हान आहे. वृद्धांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे, त्यानुसार होणारा भेदभाव नष्ट करणे, त्यांच्यामुळे वृद्धांवर होणारा मानसिक दुष्परिणाम थांबवणे हे सर्व समाजाचे कर्तव्य आहे. असे झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना आतापर्यंत आयुष्यभर त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, जगामध्ये साठ वर्षांवरील 12 कोटी लोक आहेत आणि ती संख्या पुढील काही वर्षांत दुप्पट होणार आहे. सर्वात अधिक संख्या विकसनशील देशांत वाढणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, सकस आहार, स्वच्छता, शिक्षण आणि आर्थिक सुबत्ता यामुळे सरासरी आयुर्मान वाढलेले आहे. या वेगवान जगात व राहणीमानात ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे. उदाहरणार्थ स्वयंसेवी कार्य करणे, आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला करून देणे आणि कुटुंबामध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱया पेलणे. त्यासाठी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने आपले आरोग्य सांभाळणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
जसा वृद्धापकाळ सुरू होतो तसतसे काही दुर्धर आजार बळावयास लागतात आणि त्याचा परिणाम विकलांगत्व होण्यात होतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे स्वातंत्र्यपूर्ण जगणं थांबतं. परावलंबित्व वाढण्याने प्रतिकार क्षमता कमी होते, जी पुन्हा नवीन रोगांना आमंत्रण ठरते. परावलंबत्वामुळे सामाजिक जीवन संपुष्टात येते. घरातील लोक लक्ष देईनासे होतात. त्यामुळे परिस्थिती आणखीच बिघडते. हृदयविकार, मधुमेह, हाडे फ्रॅक्चर होणे, संधिवात आणि कॅन्सर असे मुख्य रोग आहेत, ज्यामुळे वृद्धापकाळात सर्वाधिक त्रास होतो.
मानसिक आजार वृद्धावस्थेत अधिक वाढताना दिसतात. आज जे वृद्ध आहेत, त्यांच्या उमेदीच्या काळात मानसिक आजारांबद्दल एवढी जागरूकता नव्हती. ती आजच्या काळात वाढणे गरजेचे आहे. 65 वर्षांनंतर डिमेन्शिया, विसराळूपणा हा सर्वात जास्त आढळणारा आजार आहे. त्याचबरोबर एंक्झायटी, नैराश्य असे अनेक आजार दिसून येतात. ताप आला, साखर वाढली, रक्तदाब वाढला की, आपण लगेच डॉक्टरकडे जातो, त्याप्रमाणे मानसिक आजारासाठी आपण खरंच काही तपासणी करतो का? तर उत्तर `नाही’ असे आहे. वृद्धांनी केलेल्या आत्महत्यांमध्ये 75 टक्के लोक नैराश्याने आजारी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नैराश्याची लक्षणे आढळल्यास लवकर डॉक्टरांशी संपर्क करा. सतत दुःखी वाटणे, चिंतातुर असणे, रिकामपणा वाटणे, आपण कोणाच्याच उपयोगी नाही, होपलेस आहोत असे वाटणे, कुठल्या आशाआकांक्षा न वाटणे, सतत अपराधी असण्याची भावना, थकवा येणे, एकाग्रता कमी होणे, विसराळूपणा वाढणे, झोप न लागणे, लवकर जाग येणे, अति झोप येणे, निर्णय क्षमता कमी होणे, आत्महत्या करण्याचे विचार येणे, चिडचिड, अस्थिर वाटणे अशी काही कारणे लक्षणे आढळल्यास त्यासाठी त्वरित योग्य डॉक्टरांशी संपर्क साधा.
ज्येष्ठ नागरिकांनी स्वत काळजी कशी घ्यायची ?
- आपल्या आरोग्यपूर्ण राहण्याच्या गरजा ओळखा. त्याप्रमाणे आरोग्य तपासण्या करून घ्या. त्यासाठी विश्वासू, ज्ञानी फॅमिली डॉक्टर असणे आवश्यक आहे.
- फळे, वेल वर्गातील भाज्या, सालासकट कडधान्ये, ज्यात भरपूर फायबर आहे अशा गोष्टी आहारात हव्यात.
- वजन अतिरिक्त वाढले असेल तर ते नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
- रोज हलका व्यायाम, चालणे, योगासने, ध्यानधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे.
- धूम्रपान आणि मद्य सेवन टाळा.
- भरपूर विश्रांती घ्या, झोपण्याची लाज बाळगू
- नका. एखाद वेळेस रात्री उशिरापर्यंत झोप नाही
- येणार. दिवसा थोडा थोडा वेळ झोप पूर्ण करा.
- स्वतला अजिबात मानसिक ताण देऊ नका.
स्वतला सामाजिक कार्यांमध्ये आणि सांस्कृतिक कार्पामात गुंतवून घ्या. `रिकाम्या डोक्यात सैतान’ या म्हणीप्रमाणे मन रिकामे राहिल्यास मानसिक ताण वाढल्याची उदाहरणे आहेत .
जी औषधे तज्ञ डॉक्टरांनी दिली आहेत, ती शेजारपाजारच्या, मित्रमंडळींच्या सांगण्याने बंद करू नका.
Comments are closed.