जर्मनीशी करार, चीनचा पराभव

भारताच्या चालीमुळे विकासाचा मार्ग मोकळा

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अलिकडच्या काळात भारताचे चीनशी संबंध सुधारले असले, तरी कटुता अद्यापही आहे. तसेच भारताच्या विकासात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न चीनकडून होतच आहेत. तथापि, आता भारताने आपल्या विकासाला लागणारी साधनसामग्री मिळविण्यासाठी इतर समर्थ पर्याय शोधण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे चीनने सहकार्य केले नाही, तरी भारतात पायाभूत सुविधांचा विकास होत राहील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने काही चाली रचल्या आहेत. भारतात सध्या मोठ्या वेगाने पायाभूत सुविधा विकास होत आहे. विशेषत: मार्ग निर्मितीत नवे विक्रम होत आहेत.

दुर्गम भागांमध्येही डोंगर पोखरून बोगदे काढून मार्ग बांधले जात आहेत. कारण पायाभूत सुविधांचा विकास झाल्याखेरीज औद्योगिक आणि व्यापारी विकास होणे शक्य नसते. तथापि, डोंगर पोखरून बोगदे करण्यासाठी जी यंत्रसामग्री लागते, ती भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण होत नाही. त्यामुळे ती चीनकडून विकत घ्यावी लागते. ही सामग्री, विशेषत: डोंगर पोखरण्यासाठी आवश्यक असणारी ड्रिलिंग मशिन्स पुरविण्यास चीनकडून हेतुपुरस्सर विलंब लावला जात आहे. यामुळे भारतात अनेक स्थानी मार्गांची कामे रखडली आहेत. तथापि, आता भारताने या समस्येवर समर्थ तोडगा शोधला आहे.

जर्मनी करार

डोंगर पोखरणारी यंत्रसामग्री बनविण्यात आज जर्मनी जगात श्रेष्ठ आहे. त्यामुळे भारताने अशी यंत्रसामग्री भारताला अविरत मिळत रहावी, यासाठी जर्मनीच्या ‘हरेनकेंच एजी’ या कंपनीशी करार केला आहे. ही कंपनी सध्या भारतात चेन्नई येथे कार्यरत आहे. आपल्या भारतातील उत्पादन केंद्राचा विस्तार ही कंपनी करणार आहे. तसेच भारतातच डोंगर पोखरणारी यंत्रसामग्री निर्माण करणार आहे. यामुळे भारतासमोरची मोठी समस्या सुटणार आहे. तसेच भारताला चीनवरही अवलंबून राहण्याची आवश्यकता उरणार नाही, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.

दबाव आणावा लागला…

ही जर्मन कंपनी सध्या चीनमध्ये या सामग्रीचे उत्पादन करत आहे. नंतर चीन सरकारच्या अनुमतीने ही कंपनी चीनमध्ये निर्माण झालेली ही सामग्री भारताला पुरवित आहे. पण चीनने अनुमती न दिल्याने भारताची कामे रखडली आहेत. ही बाब भारताचे व्यापारमंत्री पियुष गोयल यांनी जर्मनीचे अर्थमंत्री रॉबर्ट हेबॅक यांच्यासमोर स्पष्टपणे मांडली. असेच पुढे होत राहिल्यास आम्हाला या जर्मन कंपनीकडून सामग्री विकत घेणे थांबवावे लागेल, असे स्पष्ट केले. त्यानंतर जर्मनीलाही जाग आली आणि या कंपनीने भारतातच या सामग्रीचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे हा करार करण्यात आला आहे.

आता चीनचीही हमी…

भारत आता या यंत्रसामग्रीसाठी आपल्यावर अवलंबून राहणार नाही, हे लक्षात येताच चीननेही आपली भूमिका सौम्य केली आहे. भारताला आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीचा पुरवठा विनाअडथळा केला जाईल, अशी शाश्वती आता चीनच्या प्रशासनाने भारताला दिली आहे. चीन भारताला दुर्मिळ धातू, खते आणि बोगदा खोदणारी यंत्रसामग्री भारताला हव्या तेव्हढ्या प्रमाणात पुरवत राहील, असे आश्वासन चीनने दिले आहे. याचाच अर्थ असा की, भारताने दबावतंत्राचा उपयोग केल्याने अडथळे दूर होत आहेत. तरीही भारताने यंत्रसामग्रीच्या संबंधात आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला आहे. मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत आता भारताला आवश्यक असणाऱ्या अवजड सामग्रीचे उत्पादन भारतातच, एकतर भारतीय कंपन्यांकडून किंवा विदेशी कंपन्यांकडून करून घेतले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारताने स्वीकारलेली ही ‘आत्मनिर्भर’ नीती आता भारतासाठी लाभदायक ठरत आहे, हे या उदाहरणावरून दिसत आहे.

‘आत्मनिर्भर’ होण्यातच लाभ…

  • पायाभूत सुविधा यंत्रसामग्रीसंबंधात भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
  • चीनवरील अवलंबित्व संपविण्याचा होतोय प्रयत्न, अन्य पर्यायांचा शोध
  • बोगदे खोदणारी यंत्रसामग्रीचे उत्पादन आता भारतातच होण्याची व्यवस्था
  • जर्मन कंपनी चेन्नईतील आपल्या उत्पादन केंद्राचा करणार मोठा विस्तार

Comments are closed.