भारताच्या हिताचे रक्षण करण्यासाठी करार केले पाहिजेत

अमेरिकेशी व्यापार करारावर गोयल यांचे विधान : अमेरिका भारताचा महत्त्वाचा भागीदार देश, त्याच्याशी करार हिताचा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारताच्या हिताचे संरक्षण करूनच त्या देशाशी व्यापारी करार केला जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. ते एका वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात शुक्रवारी बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले व्यापारशुल्क अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविले आहे. त्यानंतर त्या देशातील स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध व्यापक आहेत. आम्ही ‘क्वाड’, ‘पॅक्स सिलिका’ आदी आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. अमेरिकेतील परिस्थिती सध्या उत्क्रांत होत आहे. आम्ही अमेरिकेच्या संपर्कात असून आमची चर्चा होत आहे. सध्या आमचे धोरण ‘थांबा आणि वाट पहा’ असे आहे. भारताचे हित आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्याची सुरक्षा निश्चितपणे केली जाईल, असे प्रतिपादन गोयल यांनी केले आहे.

सर्वोत्तम संधीच्या शोधात

अमेरिकेशी किंवा अन्य कोणत्याही देशाशी व्यापार करार करताना आम्ही देशहितालाच प्राधान्य देत आहोत. अमेरिकेशी चर्चा करतानाही आमचे हेच धोरण आहे. भारतासाठी या करारातून सर्वोत्तम संधी कशी मिळविता येईल, याचा शोध आम्ही घेत आहोत. त्यामुळेच अमेरिकेकडून इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक लाभदायक करार मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

परिस्थितीवर अवलंबून

भारताचा अमेरिकेशी करार परिस्थितीवर अवलंबून आहे. परिस्थितीत परिवर्तन झाल्यास करारातही त्यानुसार पुनर्समतोल निर्माण करावा लागेल. या कराराचे जे सध्याचे स्वरुप आहे, त्यात अनेक मुद्दे आहेत. बहुतेक सर्व मुद्दे भारतासाठी सकारात्मक आहेत. कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचा अर्थ लावताना तो करार इतर देशांशी झालेल्या तशाच कराराच्या तुलनेत कसा आहे, हे पहावे लागते. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाला अधिक लाभ होत असेल, तर तो करार उत्तम मानावा लागतो. अमेरिकेशी करार ठरविताना आम्ही याच बाबीकडे लक्ष दिले होते. त्यामुळे या कराराचे सध्याचे जे स्वरुप आहे, ते तुलनात्मकदृष्ट्या भारताचा अधिक लाभ करून देणारे आहे. अमेरिकेने भारतावर आधी 50 टक्के कर लागू केला होता. तथापि, सातत्याने चर्चा करून आम्ही तो बराच कमी करून घेतला आहे. इतर अनेक देशांवर अमेरिकेने जो कर लावला आहे, त्यापेक्षा तो कमी आहे. याचा लाभ भारतातले शेतकरी, कारागिर, हिरे व्यावसायिक, औषधनिर्माते आदींना होणार आहे. भारताचा आर्थिक विकास वेगाने होत असून यावर्षी निर्यातीच्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

व्यापाराशिवाय नाही प्रगती

कोणताही देश व्यापाराशिवाय किंवा आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि व्यापारी युतीशिवाय प्रगती करू शकत नाही. विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार असणे आवश्यकच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासूनच यासंबंधात एक महत्त्वाचा निर्धार केला आहे. त्यांनी प्रयत्नपूर्वक देशातील स्थिती सुरळीत केली आहे. मागच्या सरकारच्या काळातील भ्रष्टाचार, घोटाळे आणि कुव्यवस्थापनापासून त्यांनी अर्थव्यवस्था मुक्त केली. पायाभूत अर्थव्यवस्था त्यांनी स्थिरस्थावर केली. आता मोठी उडी घेण्यासाठी देश सिद्ध आहे. आता आम्ही विकसित देशांशी संपर्कसेतू स्थापन केले आहेत. हे करत असताना भारताचे धोरणात्मक हित, आमच्या संवेदना आणि बलस्थाने यांना सुरक्षित ठेवून आम्ही जगासाठी आमचे दरवाजे उघडले आहेत. यामुळे आम्ही आमच्या व्यापारी भागीदार देशांसमवेत दोघांनाही लाभदायक ठरतील असे करार केले आहेत. आमच्या कोट्यावधी नागरिकांचे भवितव्य सुधारेल, अशी मांडणी त्यांनी केली आहे.

परिस्थितीनुसार निर्णय घेणार…

ड अमेरिकेशी करार करताना सध्याची परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय

ड अन्य देशांच्या तुलनेत अमेरिकेने भारताला अधिक चांगला करार दिला

ड भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड न करण्याचा सरकारचा निर्धार

Comments are closed.