अहिल्यादेवी होळकर यांच्यावर येणार बायोपिक, राज्य सरकारकडून 21.6 कोटी रुपयांचा निधी मंजूर
महाराष्ट्र शासनाने होळकर घराण्याच्या पराक्रमी आणि आदर्श कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 21.6 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने 28 मार्च रोजी यासंदर्भात शासन आदेशही काढला आहे. अहिल्यबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
हा चित्रपट प्रामुख्याने मराठीत तयार केला जाणार असून, इतर भाषांमध्येही तो प्रदर्शित करण्याची योजना आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा वारसा देशभर पोहोचवण्याचा यामागील उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्र फिल्म, स्टेज आणि सांस्कृतिक विकास महामंडळ लिमिटेड (MFSCDCL) यांच्याकडून सादर करण्यात आला असून, त्याच संस्थेमार्फत चित्रपटाची अंमलबजावणी केली जाणार आहे. चित्रपट निर्मितीसाठी पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवली जात असून, गुणवत्तेच्या आधारे निर्मात्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
अहिल्याबाई होळकर या इंदूरच्या राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात त्या सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावात धनगर कुटुंबात जन्मल्या होत्या. त्यांचा विवाह होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला होता. राज्यकारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक प्रगतिशील निर्णय घेतले. अपत्य नसलेल्या विधवांची मालमत्ता जप्त करण्याचा कायदा त्यांनी रद्द केला होता. तसेच देशभरातील अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिरांच्या पुनर्बांधणी आणि विकासात त्यांचे मोठे योगदान मानले जाते.
अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने इतरही उपक्रम हाती घेतले आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या स्मारकाच्या जतन व विकासासाठी 681 कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. तसेच 2024 च्या अखेरीस अहमदनगर जिल्हा आणि शहराचे अधिकृतपणे ‘अहिल्यानगर’ असे नामांतर करण्यात आले आहे.
Comments are closed.