मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीकडून 15 गुन्हे उघड, अहिल्यानगर गुन्हे शाखेची कारवाई; 15 गुन्हे उघडकीस

अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. गुन्हे शाखेने या टोळीकडून मंदिर चोरीचे 15 गुन्हे उघडकीस आणले असून, या कारवाईत 4 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, अंमलदार सुरेश माळी, गणेश लोंढे, विष्णू भागवत, फुरकान शेख, राहुल डोके, आकाश काळे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित
येमुल, प्रशांत राठोड, महादेव भांड, सोनल भागवत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पाथर्डी तालुक्यातील करोडी येथील शनिमारुती मंदिरातील दानपेटी फोडून 3 लाख 50 हजार रुपये चोरून नेल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पथक आरोपींची माहिती काढत असताना, सदरचा गुन्हा आरोपी राहुल भालेराव व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. राहुल किशोर भालेराव (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर), रामेश्वर ज्ञानदेव धनेश्वर (रा. इंदिरानगर, भोकर, ता. श्रीरामपूर), एकनाथ नारायण माळी (रा. ममदापूर, ता. राहाता, हल्ली रा. बिरोबा बन, शिर्डी), शत्रुघ्न मुरलीधर मोरे (रा. टाकळीमानूर, ता. पाथर्डी) यांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचे साथीदार राहुल भाऊसाहेब माळी (रा. बिरोबा बन, शिर्डी) (पसार), पांडू ऊर्फ दत्तू बाबासाहेब मोरे (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) (पसार), दत्तू मोरे याचा एक अनोळखी मित्र यांनी मिळून मागील 7 ते 8 महिन्यांमध्ये जिल्ह्यातील मंदिरांमध्ये घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, दागिने, गुन्ह्यावेळी वापरलेल्या दोन दुचाकी, मोबाईल, असा 4 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Comments are closed.