Ahilyanagar Crime News – संगमनेरमध्ये 13 वर्षीय मुलीवर ॲसिड हल्ला, प्रकृती चिंताजनक; परिसरात संतापाची लाट
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवार येथील हाडकी ओढा परिसरात 13 वर्षीय शालेय मुलीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (17 मार्च 2026) दुपारी उघडकीस आली. ईश्वरी संजय डहाळे असे जखमी मुलीचे नाव असून, ती शाळेतून घरी परतत असताना हा भ्याड हल्ला करण्यात आला. या अमानुष घटनेत ईश्वरी गंभीररीत्या भाजली असून तिला तातडीने लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या चिंताजनक असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून, स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक त्याच्या मागावर आहे. या निर्घृण कृत्याचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत असून, आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Comments are closed.