कोयत्याच्या धाकाने लूटमार करणारे गजाआड, 4 आरोपींसह तिघे अल्पवयीन ताब्यात; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर वाहनचालकांना कोयता, चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या दोन टोळ्यांमधील चार आरोपीसह तीन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. आरोपींकडून सुपा येथील जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. यश शिरसाठ (वय २०), अथर्व सूर्यवंशी (वय १९), साहिल शेख (वय २१), विशाल पाटोळे (वय २०, सर्व रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना पथकाने ताब्यात घेतले.
सुपा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी यश शिरसाठ याने त्याच्या साथीदारांसह केला असून, तो सध्या गांधीनगर-बोल्हेगाव येथे साथीदारांसह बसला आहे. त्यानुसार कबाडी यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकाने त्या ठिकाणी छापा टाकत चौघांसह तीन अल्पवयींना ताब्यात घेतले.
शिरसाठ याने सुपा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याची कबुली देत तो गुन्हा अथर्व सूर्यवंशी आणि फरार असलेले आदित्य भोसले, चेतन सरोदे व दोन अल्पवयीन यांच्यासह केला असल्याचे सांगितले.
अहिल्यानगर ते पुणे रोडवर एक दुचाकीचालक लघुशंकेसाठी थांबलेला असताना त्यास दमदाटी करून त्याची दुचाकी, तसेच एक पिशवी बळजबरीने घेतल्याचे सांगितले. त्याने साथीदार साहिल शेख याच्यासह पसार झालेले विशाल पाटोळे, नयन पाटोळे, प्रेम नायर व एक अल्पवयीन यांच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. सोमवारी (२५ रोजी) रात्री २ वाजता अहिल्यानगर ते पुणे रोडवरील म्हसणे फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकच्या चालकास कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल, रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू भागवत, गणेश लोंढे, भीमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, बाळू खेडकर, भाऊसाहेब काळे आदींच्या पथकाने केली.
Comments are closed.