अहिल्यानगरात महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूतीदरम्यान अर्भकाचा मृत्यू; निष्काळजीपणाचा गंभीर आरोप

अहिल्यानगर शहरात आज (ता. 15) महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाची धामधूम सुरू असतानाच मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रसूती सुरू असताना अर्भकाच्या डोक्याला कात्री लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप माळीवाडा परिसरातील साठे (वैरागळ) कुटुंबीयांनी केला आहे.

नगर शहरालगत ओळख गाव परिसरात राहणारे दीपक वैरागळ हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज सकाळी त्यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपस्थित परिचारिकांनी ‘थोडा वेळ लागेल’ असे सांगितल्याने दीपक वैरागळ हे स्वतःची गाडी आणण्यासाठी घरी गेले.

त्यांच्या अनुपस्थितीतच परिचारिकांनी पुढील उपचार सुरू करून प्रसूती केली. मात्र, या प्रक्रियेदरम्यान बाळाच्या डोक्याला धारदार वस्तू लागल्याने अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल दोन तासांपर्यंत बाळाबाबत कोणतीही माहिती न देता कुटुंबीयांना कपडे आणण्यास सांगण्यात आले तसेच कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या. याआधीच बाळाच्या आजोबांच्या सह्या घेतल्याचेही समोर आले आहे. सायंकाळी सुमारे पाच वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात जाब विचारण्यास सुरुवात केली. संतप्त कुटुंबीयांनी शेजारील कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक वैरागळ म्हणाले,“दुपारी रुग्णालयात आल्यानंतर खरी परिस्थिती समोर आली. येथे कोणताही मोठा डॉक्टर उपस्थित नव्हता. केवळ नर्सेसनी प्रसूती करण्यास सुरुवात केली. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच बाळाच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. आम्हाला अंधारात ठेवून आमच्याकडून सह्या घेतल्या. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.” या गंभीर प्रकारामुळे महापालिकेच्या रुग्णालयातील आरोग्यसेवेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची जोरदार मागणी होत आहे.

Comments are closed.