कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर


अहिल्यानगर : जिल्ह्यातील विखे पाटील विरुद्ध कोल्हे असा सुरू असलेला सुप्त संघर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही दिसून आला. समोरच्या उमेदवाराला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं असं स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांनी म्हटलं. तर त्यावर राधाकृष्ण विखेंनीही (Radhakrishna Vikhe Patil) उत्तर दिलं. वक्तव्य करताना संयम ठेवला पाहिजे, कोपरगावमध्ये भाजपचाच उमेदवार निवडून येणार याची ग्वाही देतो असं विखे म्हणाले.

कोपरगाव नगरपालिका निवडणूक ही महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपने प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादी अजित पवार गटांने कोपरगावमध्ये दिलेला उमेदवार काकासाहेब कोयते हे भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्या जवळचा असल्याचा आरोप केला जात आहे. काका कोयटे यांची राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ‘काकाचे आका कोण?’ हा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच प्रश्नाला धरून आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोरच कोल्हे आणि विखे यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला.

2019 विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाल्यानंतर विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष समोर आला होता. त्यानंतर दोघांनीही कायमच एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदासाठी काका कोयटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विवेक कोल्हे यांनी नाव न घेता राषधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली होती. काकाचा आका कोण हे आम्हाला माहिती आहे असं ते म्हणाले होते.

त्यानंतर प्रथमच विखे पाटील कोपरगाव मध्ये आले. मात्र चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच विवेक कोल्हा आणि स्नेहलता कोल्हे यांनी भाषणातून पालकमंत्री विखे यांच्यावर भाष्य केलं. त्यानंतर पालकमंत्री विखे यांनी देखील कोल्हे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना सल्ला देखील दिला.

Snehalata Kolhe Vs Radhakrishna Vikhe : कुणाला किती पाठीशी घालायचं हे ठरवा

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, फडणवीसांवर, मोदी साहेबांवर प्रेम करणारी ही कोपरगावची जनता आहे. आज पालकमंत्री देखील इथे आले आहेत. कोपरगावमध्ये झालेला अमित शाहांचा कार्यक्रम हा लोणीपेक्षा चांगला झाला , अतिशय सुंदर झाला असं त्यावेळी कोयटे यांनी सांगितलं. आता ते समोरच्या पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे पालकमंत्री साहेब कुणाला किती पाठीशी घालायचं हे तुम्ही ठरवा. माणसं अशी दल बदलू असतात.

स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अनेक ठिकाणी आघाडी आहे, बिघाडी देखील आहेत. जिल्ह्यात 12 पैकी दहा ठिकाणी भाजपचे उमेदवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत. आपला कोपरगावचा उमेदवार हा भाजपचा आहे. तुम्ही मला आका म्हणा किंवा काही म्हणा… मला त्याचं काही वाटत नाही. आकाच्या मनात आलं तर तो काय करू शकतो हे मी देखील करून दाखवू शकतो. निवडणुकीत यश पाहिजे असेल तर संयम ठेवला पाहिजे, वक्तव्य करताना काळजी घेतली पाहिजे. आमच्या भाचीवर शंका मी घेत नाही. मी शांत माणूस आहे मामा सगळं सहन करतो. निवडणूक जिंकण्यासाठीच मी येथे आलो आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द खाली पडेल असं कोणत्याही परिस्थिती होणार नाही. कोपरगामध्ये भाजपचाच उमेदवार निवडून येणार याची ग्वाही देतो.

आणखी वाचा

Comments are closed.