स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मध्य प्रदेशहून 9700 बॅलेट, 4877 कंट्रोल युनिट दाखल
अहिल्यानगर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) मध्य प्रदेश राज्यातून प्राप्त झाली असून, जिल्हा प्रशासनाकडे एकूण 9 हजार 700 बॅलेट युनिट व 4 हजार 877 कंट्रोल युनिट आले आहेत. या यंत्रांची लवकरच पडताळणी प्रक्रिया सुरू होणार आहे. या सर्व यंत्रांचा नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत वापर करण्यात येणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या एकूण 289 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 502 मतदान केंद्रांवर एकूण चार लाख 51 हजार 287 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक पार पाडण्यासाठी दोन हजार 224 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून, राखीव 10 टक्के कर्मचारी धरून अडीच हजारांहून अधिक कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात येईल.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व ईव्हीएम यंत्रांची जिल्हा व तालुका स्तरावर काटेकोर तपासणी व पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर योग्यरीत्या कार्यरत यंत्रेच वापरली जातील, याची खात्री केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी 502 बॅलेट युनिट आणि एक हजार चार कंट्रोल युनिटची मागणी करण्यात आली असून, अतिरिक्त 10 टक्के यंत्रे राखीव ठेवण्यात येतील.
मतदान केंद्रांवर आवश्यक पायाभूत सुविधा, सुरक्षेची व्यवस्था आणि कर्मचार्यांचे प्रशिक्षण यावर विशेष भर देण्यात येत आहे.
निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करणे – 10 नोव्हेंबरपासून
अर्ज दाखलची अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी – 18 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज माघारी – 21 नोव्हेंबरपर्यंत
अपील असलेल्या ठिकाणी – 25 नोव्हेंबरपर्यंत
मतदान – 2 डिसेंबर
मतमोजणी – 3 डिसेंबर
Comments are closed.