अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; संगमनेरमध्ये 1 कोटी 14 लाखांचा गांजा जप्त

संगमनेर शहरापासून जवळ असलेल्या सुकेवाडीत गुरुवारी सकाळी अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापेमारी केली. या छापेमारीत तब्बल 456 किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 14 लाख रुपये आहे. संगमनेर शहरातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सुकेवाडी येथील उत्तम पडवळ नावाच्या व्यक्तीच्या घरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने विशेष पथक तयार केले. पडवळ याचा मुलगा तुषार उत्तम पडवळ हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. तर उत्तम पडवळ याला पथकाने ताब्यात घेतले आहे.
छाप्या दरम्यान घरातील आतल्या खोलीत तसेच एका छोट्या वाहनामध्ये पोत्यांमध्ये भरलेला मोठा गांजाचा साठा आढळून आला. जप्त केलेल्या पदार्थांची बाजारभावानुसार किंमत सुमारे 1 कोटी 14 लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे. छापेमारीत नाशिक, मुंबई, अहिल्यानगर, पुणे येथील विशेष पथकांचाही समावेश होता.

Comments are closed.