अहिल्यानगर उपजिल्हा रुग्णालयातील तपासणी चार अल्पवयीन गरोदर माता आढळल्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांच्या नियमित तपासणीत चार अल्पवयीन गरोदर माता आढळल्याने खळबळ उडाली आहे. अठरा वर्ष पूर्ण होण्याआधीच विवाह होऊन गरोदर राहिलेल्या चार मातांची ओळख आज उघड झाली. या चारही गरोदर मातांची नावे उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने पोलीस प्रशासनाला पाठवली आहेत. एकीकडे बालविवाह रोखण्यासाठी शासन सतर्क असताना दुसरीकडे एकाचवेळी चार गरोदर माता आढळून आल्याने तालुक्यात तरी बालविवाह रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे मानले जात आहे.

येथील उपजिल्हा रुग्नालयात दर शनिवारी गरोदर मातांची नियमित तपासणी केली जाते. या तपासणीत तालुक्यातील माणिकदौण्डी, डमाळवाडी, उचेगाव व पाथर्डी शहरातील प्रत्येकी एक अशा चार गरोदर माता असल्याचे उघड झाले. यातील माणिकदौण्डी येथील एका मातेने खोटे आधारकार्ड वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवले, मात्र हा खोटेपणा उघडकीस आला. डमाळवाडी येथील गरोदर मातेचे वय आधारकार्डनुसार सध्या अठरा दिसत असले तरीही ती ज्या वेळी गरोदर राहिली त्या वेळी ती सतरा वर्षांची असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. असाच प्रकार पाथर्डी शहर व उचेगाव येथील गरोदर मातेच्या संदर्भात झाला असल्याचे आढळून आला आहे.

या संदर्भातील अहवाल उपजिल्हा रुग्नालय प्रशासनाने पोलीस प्रशासनाला कळवला आहे. पोलीस प्रशासनाने या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे. तालुका प्रशासनाने तालुक्यातील अनेक गावात बालविवाह होऊ नये यासाठी समित्या स्थापन केल्या असल्या तरीही या समित्या कागदोपत्री असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. हे चारही बालविवाह लावणाऱ्यांचे नातेवाईक, समितीचे सदस्य, फोटोग्राफर, या विवाहासाठी जागा देणारे मंगलकार्यालयाचे चालक, मंडपवाले, भटजी यांच्यावर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे.

Comments are closed.