Ahilyanagar News – पावसाने दाणादाण उडवली; 423 गावे बाधित, 84 हजार 860 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

अहिल्यानगर जिल्ह्यात 20 व 21 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी, पूर व सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात 423 गावे बाधित झाली असून, 84 हजार 860 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, भाजीपाला, कांदा, संत्रा, सीताफळ, बाजरी, उडीद, मूग, मका, तूर, केली, लिंबू, सूर्यफूल, कापूस संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.

शेवगाव तालुक्यात सर्वाधिक 104 गावांतील 38 हजार 62 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 56 हजार 27 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पाथर्डी तालुक्यात 137 गावांतील 10 हजार 986 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 9 हजार 828 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. अहिल्यानगर तालुक्यातील 23 गावांतील 4 हजार 547 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले असून, 5 हजार 376 शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

कर्जत तालुक्यातील 61 गावांतील 1 हजार 289 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 1 हजार 289 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जामखेड तालुक्यातील 87 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, 28 हजार 660 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, यात 28 हजार 660 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राहाता तालुक्यातील आठ गावांत नुकसान झाले असून, 1 हजार 238 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. 1 हजार 587 शेतकऱ्यांना फटका.

अतिवृष्टीचा तडाखा

जिल्ह्यात दोन दिवसांत 84 हजार 860 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, 1 लाख 16 हजार 841 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. यात फळबाग, सोयाबीन, डाळिंब, भाजीपाला, कांदा, संत्रा, सीताफळ, बाजरी, उडीद, मूग, मका, तूर, केळी, लिंबू, सूर्यफूल, कापूस आदी पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील 4 गावांतील 78 हेक्टर क्षेत्रावरील 132 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा तडाखा सहन करावा लागला आहे.

Comments are closed.