Ahilyanagar News अमित शहा येणार म्हणून स्टेशन रोडला मुहुर्त मिळाला, चार वर्षांपासून रखडलेला रस्ता एका दिवसात झाला तयार

सहकार मंत्री शंकरराव कोल्हे कारखाना येथील दोन नव्या प्रकल्पाचे उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोपरगाव येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सध्या शहरातील यंत्रणा कामाला लागल्या असून गेल्या चार पाच वर्षांपासून रखडलेला स्टेशन रोड देखील अवघ्या एका दिवसात तयार झाला आहे.

शुक्रवारच्या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोपरगावमध्ये येणार आहेत. केंद्रातील मंत्री येणार म्हणून कोपरगाव मधील साई तपोभूमी ते रेल्वे स्टेशन रस्ता चक्क एका दिवसात रस्ता तयार करण्यात आला आहे. याच रस्त्यासाठी कोपरगाववासी गेल्या 4 ते 5 वर्षापासून संघर्ष करत होते.

शहरात कोणी मोठा मंत्री येणार असला की सर्व यंत्रणा कशा कामाला लागतात…याचं उत्तम उदाहरण कोपरगावमध्ये दिसून आलंय. केंद्रीय मंत्री हे कोपरगावमध्ये येणार असल्याने फक्त रस्तेच चकाचक झाले नाहीत तर रस्त्याच्या दुभाजकांवर वाढलेल्या झाडी-झुडपांची छाटणी सुद्धा केली. रस्त्याच्या दुभाजकांच्या कठड्यांना पुन्हा रंग चढवण्यात आल्यामुळे स्टेशन रोड अगदी चकाचक झालंय. मंत्र्यांच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली असून हा मार्ग झाडून स्वच्छ करून अत्यंत सुव्यवस्थित आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केलाय. वाहनांची कोंडी होऊ नये याची खबरदारी सुद्धा घेण्यात आलीय.

साहित्य भूमी ते स्टेशन रोड या अत्यंत गजबजलेल्या व विद्यार्थ्यांसाठी कामगारांसाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली होती. याबाबत सातत्याने वर्तमानपत्रातून बातमी येत होत्या, परंतु कधी पावसाचे नाव तर कधी निधीचे नाव सांगून सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सातत्याने टाळाटाळ केली जात होती. विशेष म्हणजे गेल्या ४ ते ५ वर्षापासून इथले कामगार विद्यार्थी गावकरी रस्त्यासाठी मागणी करत होते. पण केंद्रीय मंत्री अमित शहांच्या कृपेने हा रस्ता अवघ्या एका दिवसात तयार झालाय. ही किमया सार्वजनिक बांधकाम खात्याने साधली आहे. त्यामुळे रोज मंत्र्यांचे दौरे शहरात झाले तर शहर किती सुंदर दिसेल अशा उपरोधिक भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Comments are closed.