आमदार संग्राम जगताप यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस, अजित पवार यांच्याकडून कारवाई
पुणे, सोलापूर येथे झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी ‘दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा’ असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार जगताप यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
अजित पवार म्हणाले, ‘पक्षाची विचारधारा ठरलेली आहे. तरीदेखील कोणी जबाबदार पदावर असलेली व्यक्ती अशाप्रकारची विधानं करत असेल, तर ती पक्षाला मान्य नाहीत. अरुणकाका जगताप हयात असताना सर्व काही सुरळीत होतं; पण संग्राम जगताप यांनी आता जबाबदारीने वागायला आणि बोलायला हवं. याआधी अशा विधानांबाबत त्यांना समज दिली होती, त्यांनी सुधारणा करेन असं सांगितलं होतं; पण तसे दिसत नाही’, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला. आता जगताप यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेने पक्षातच तणाव निर्माण केला आहे. आमदार जगताप हे भाजपचे मंत्री नितेश राणे आणि आमदार पडळकर यांच्यासोबत हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये सक्रिय होत आहेत. त्यांच्या भाषणांतून प्रखर हिंदुत्ववादी सूर उमटत असल्यामुळे ते राष्ट्रवादीच्या विचारसरणीपासून दूर जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
आमदार जगताप यांनी सोलापुरातील मोर्चात, ‘दीपावलीची खरेदी फक्त हिंदू व्यापाऱ्यांकडूनच करावी. सध्या हिंदूंवर आणि मंदिरांवर हल्ले मशिदींमधून होत आहेत. त्यामुळे हिंदू व्यापाऱ्यांनाच आधार द्या’, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर आमदार जगताप यांनीच आपल्या विधानाचे स्पष्टीकरण दिल्यानंतर आता पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी संताप व्यक्त करत आमदार जगताप यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
नोटीस औपचारिकता की कारवाई होणार
पक्षाध्यक्ष अजित पवार खरोखरच आमदार जगताप यांच्यावर कारवाई करतील का, की पुन्हा एकदा राजकीय समीकरणांमुळे ही नोटीस केवळ औपचारिक ठरेल? याबाबत जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यांना दिलेली नोटीस नवीन नसून, यापूर्वीही आमदार जगताप यांना अशा प्रकारच्या नोटिसा दिल्या असल्यामुळे हा फार्स ठरतो की काय, अशी चर्चा आहे. दरम्यान, आता जगताप पक्षाच्या नोटीसीला काय उत्तर देणार, त्यांच्यावर कारवाई झाल्यास त्याचा राजकीय परिणाम काय होईल? याकडे लक्ष लागले आहे.
Comments are closed.